दुस-याच्या घरट्यात अंडी घालण्याची वृत्ती घातक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 04:22 PM2018-11-21T16:22:33+5:302018-11-21T16:22:48+5:30
हरिश्चंद्र चव्हाण : कामांचे श्रेय लाटणा-यांवर आरोप
पेठ - काही पक्षी स्वत:चे घरटे न बांधता दुस-याच्या तयार घरटयात अंडी घालत असतात. अशीच काहीशी वृत्ती राजकारणातही दिसून येत असून स्वत:चे बेगडी कर्तृत्व सिध्द करण्यासाठी इतरांनी प्रयत्न करून मंजूर करून आणलेल्या विकास कामांचे श्रेय लाटण्याचा केवीलवाणा प्रयत्न विरोधकांकडून केला जात असल्याचा आरोप खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केला आहे.
आदिवासी विकास उपयोजनेंतर्गत पेठ तालुक्यातील उभिधोंड, बोरवठ, उस्थळे, देवगाव, कोहोर, रूईपेठा, दोनावडे, शिंगदरी, मुरूमट्टी, चोळमुख येथील रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे हस्ते करण्यात आले. पेठ तालुक्यातील शिंगदरी येथे झालेल्या सभेत बोलतांना चव्हाण यांनी सांगितले की, पेठ तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून रस्ता सुधारण्याची सर्वच लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. कोणत्याही प्रकारचे पक्षीय मतभेद न ठेवता विकासाच्या मुद्यावर एकत्र येण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी भाजपाचे जिल्हा संघटनमंत्री बापू पाटील, सभापती पुष्पा गवळी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रशांत भदाणे, सुनिल केदार, अजित ताडगे, तालुकाध्यक्ष पद्माकर कामडी, गटनेते भागवत पाटील, कांतीलाल राऊत, रामदास भोये, पंढरीनाथ जाधव, रघुनाथ चौधरी, राजेंद्र शिंदे, निवृती गालट, नंदू गवळी, पुंडलिक भोये, सोमनाथ जाधव, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, उपअभियंता कोकरे,सरपंच यमूना कुवर, सोनाली कामडी, कविता महाले यांचेसह सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.
राम -रावण वादात आदिवासी
सध्या आदिवासी समाजासमोर विकासाची अनेक आवाहने आ वासून उभी असतांना आदिवासींच्याच काही तथाकथित संघटनांकडून राम आणि रावण या मुद्यावर आदिवासी जनतेला गुंतवून ठेवले जात आहे. बोगस आदिवासींचे होणारे अतिक्र मण मुळ आदिवासी साठी घातक ठरणारे असून आदिवासी समाजाने आता याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे खा. चव्हाण यांनी सांगितले. अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागू न देता धनगर समाजाला आरक्षण द्यावे. मात्र त्यांना अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यात येऊ नये, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.