नाशिकमध्ये बकरी ईद उत्साहात; भर पावसात ईदगाह मैदानात सामूहिक नमाज पठण!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 01:19 PM2022-07-10T13:19:34+5:302022-07-10T13:20:12+5:30

मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या लाटेमुळे बकरी ईदचा सामूहिक नमाजपठणाचा सोहळा ईदगाह मैदानावर संपन्न होऊ शकला नव्हता. यंदा ईदवर पावसाचे सावट आले, तरीही पुर्वनियोजित वेळेप्रमाणे ईदनिमित्त ईदगाह मैदानावरील ओट्यावर नमाजपठण करण्यात आले.

Eid al-Adha in Nashik Collective prayers at Eidgah ground in heavy rain | नाशिकमध्ये बकरी ईद उत्साहात; भर पावसात ईदगाह मैदानात सामूहिक नमाज पठण!

नाशिकमध्ये बकरी ईद उत्साहात; भर पावसात ईदगाह मैदानात सामूहिक नमाज पठण!

googlenewsNext

नाशिक : शहर व परिसरात ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईद रविवारी (दि.१०) धार्मिक पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळपासून पाऊस सुरू असला तरीदेखील मुस्लीम बांधवांमध्ये ईदचा उत्साह कायम होता. शहाजहॉनी ईदगाह मैदानावरपरंपरेनुसार शहर-ए-खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वात ईदचे सामुहिक नमाजपठण भर पावसात करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय एकात्मता, जातीय सलोखा व शांतता नांदावी, यासाठी विशेष ‘दुवा’ मागण्यात आली. 

मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या लाटेमुळे बकरी ईदचा सामूहिक नमाजपठणाचा सोहळा ईदगाह मैदानावर संपन्न होऊ शकला नव्हता. यंदा ईदवर पावसाचे सावट आले, तरीही पुर्वनियोजित वेळेप्रमाणे ईदनिमित्त ईदगाह मैदानावरील ओट्यावर नमाजपठण करण्यात आले. नेहमीच्या तुलनेत समाजबांधवांची संख्या अत्यल्प होती. मात्र ईदगाहच्या मुख्य ओटा हा पूर्णपणे भरला होता. यावेळी समाजबांधवांनी पाणकापड, प्लॅस्टिक चटई, छत्री, रेनकोट सोबत बाळगल्याचे दिसून आले. सलग चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे मैदानावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरलेले आहे. यामुळे ओट्याच्या खाली लोकांनी नमाजपठण केले नाही. 

दरम्यान, प्रारंभी खतीब यांनी उपस्थितांना नमाजपठणाची पद्धत समाजवून दिली. सकाळी पावणे दहा वाजता नमाजपठणाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर अरबी भाषेतून खतीब यांनी खुतबा पठण केला. संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी यावेळी प्रार्थना करण्यात आली. इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्यावर अधारित दरुदोसलामचे पठण करुन नमाजपठणाच्या छोटेखानी साेहळ्याची उत्साहात सांगता करण्यात आली. उपस्थित समाजबांधवांनी एकमेकांना अलिंगण देत हस्तांदोलन करत ‘ईद’च्या शुभेच्छा दिल्या. ईदगाह मैदानावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी ईदगाहवर उपस्थित राहत शहर ए खतीब हिसामुद्दीन अशरफी,  समाजाचे ज्येष्ठ धार्मिक नेते हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी यांना पुष्पगुच्छ देत ‘ईद मुबारक’ म्हटले.
 

Web Title: Eid al-Adha in Nashik Collective prayers at Eidgah ground in heavy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.