मुस्लीम बहुल भागात ‘ईद-ए-मिलाद’चा उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 05:45 PM2019-11-09T17:45:54+5:302019-11-09T17:52:24+5:30
देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने केलेला न्यायनिवाडा आणि दिलेला निकाल हा सर्वोत्कृष्ट असाच आहे. भारतीय संविधान, लोकशाहीला लक्षात घेत न्यायालयाने निकाल दिला. निकालाने देशाची लोकशाही बळकट होण्यास मदत होणार आहे. तसेच हा भारतीय संविधानाचा विजय आहे.
नाशिक : मुस्लीम बहुल भागात प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंती अर्थात ‘ईद-ए-मिलाद’च्या तयारीचा उत्साह बघावयास मिळाला. शनिवारी (दि.९) सकाळपासूनच मुस्लीम बहुल भागात तरूणाई घरे, दुकाने व आपला परिसर सजविण्यात दंग असल्याचे चित्र पहावयास मिळाले. सायंकाळपासून अंतीम टप्प्यात आलेल्या सजावटीच्या तयारीने अधिकच जोर धरला. जुने नाशिक, वडाळागाव, विहितगाव, देवळाली कॅम्प आदि भागात मुस्लीम तरूण मित्र मंडळांसह विविध संघटना, संस्थांकडून आपआपला परिसर आकर्षक पध्दतीने सजविण्यावर भर दिला जात होता.
नाशिक : इस्लामचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती (ईद-ए-मिलाद) येत्या रविवारी (दि.१०) शहर व परिसरासह जिल्ह्यात साजरी होत आहे. या पार्श्वभूमीवर शहराची बाजारपेठ सजली आहे. घरे, दुकानांसह आपापला परिसर सजविण्याची लगबग मुस्लीम बहुल भागात पहावयास मिळत आहे. मशिदींवर करण्यात आलेल्या रोषणाईने नूर पालटला आहे.
दरवर्षी उर्दू महिना ‘रबीउल अव्वल’च्या १२ तारखेला ईद-ए-मिलाद साजरी केली जाते. मुस्लीम बहुल भागात सजावट साहित्य विक्रीचे दुकाने थाटली आहेत. हिरवे, पांढरे झेंडे, पताका, चमकी, विद्युत रोषणाईच्या माळा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. सजावट साहित्यांना मागील तीन दिवसांपासून असलेली मागणी पैगंबर जयंतीच्या पुर्वसंध्येला अधिकच वाढली. नागरिकांकडून घरे, दुकाने सजविण्यावर भर देण्यात आला आहे. यासोबतच विविध युवक मित्रमंडळांकडून आपापला परिसर सजविण्यासदेखील प्राधान्य दिले जात आहे. परिसर सजविताना रस्त्याच्या दुतर्फा झेंडे, स्वागत कमानी लावण्यात येत आहेत. तसेच रोषणाईसाठी मंडप उभारणीवर भर दिला जात आहे. जुने नाशिक, वडाळागाव, देवळाली कॅम्प, नाशिकरोड या भागात गल्ली-बोळात मिलादच्या तयारीने वेग घेतला आहे. सजावट करण्यासह विविध प्रकारचे आकर्षक धार्मिक देखावे उभारणीही सुरू आहे. बहुतांश सामाजिक सांस्कृतिक मित्रमंडळांचे देखावे पुर्णत्वास आले आहेत. देखावे उभारताना किंवा स्वागत कमानी, फलक लावताना कु ठल्याही प्रकारे रहदारीला तसेच मुख्य मिरवणूकीला अडथळा होणार नाही,याबाबतही दक्षता घेतली जात आहे.
‘अयोध्या’बाबत ‘जो हुवा, अच्छा हुवा’ अशीच प्रतिक्रिया
देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने केलेला न्यायनिवाडा आणि दिलेला निकाल हा सर्वोत्कृष्ट असाच आहे. भारतीय संविधान, लोकशाहीला लक्षात घेत न्यायालयाने निकाल दिला. त्यामुळे या निकालाने देशाची लोकशाही बळकट होण्यास मदत होणार आहे. तसेच हा भारतीय संविधानाचा विजय आहे. मागील अनेक वर्षांपासून वादग्रस्त व तणावाचे कारण ठरणाऱ्या मुद्याचा अखेर ‘सुप्रीम फैसला’ कायमस्वरूपी झाल्याचे समाधानदेखील मुस्लीम समाजात पहावयास मिळाले. ‘जो हुवा वो बहुत अच्छा हुवा’ अशी प्रतिक्रीया समाजाच्या नेत्यांकडून उमटली.
‘जुलूस-ए-मुहम्मदी’चे नियोजन
जुने नाशिक, वडाळागाव, नाशिकरोड या भागातून सालाबादप्रमाणे पारंपरिक पध्दतीने पैगंबर जयंतीनिमित्त येत्या रविवारी मिरवणुकांचे (जुलूस) आयोजन करण्यात आले आहे. वडाळागावातून जामा गौसिया मशिदीपासून सकाळी ९ वाजता मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच नाशिकरोडमधूनही सकाळच्या सुमारास जुलूस निघणार आहे. मुख्य ‘जुलूस-ए-मुहम्मदी’ जुने नाशिकमधून रविवारी दुपारी ३ वाजता शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार आहे.
अन्नदानाची जय्यत तयारी
पैगंबर जयंतीच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे बागवानपुरा चौकात येथील मुस्लीम युथ ग्रूपच्या वतीने सामुहिकरित्या अन्नदान केले जाणार आहे. यासाठी पुर्वसंध्येपासूनच तयारी पुर्ण करण्यात आली आहे. शेकडो किलोचे अन्नदान दरवर्षी या ठिकाणी पैगंबर जयंतीच्या दिवशी सकाळी १० ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान केले जाते. यंदाही हा कार्यक्रम पार पडणार आहे. शनिवारी दुपारपासून यासाठी तरूणाई तयारी करताना दिसून आली.