ईद-ए-मिलाद : नाशिकमधील मशिदी नटल्या विद्युत रोषणाईने; सर्वत्र उत्साहाचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 05:47 PM2017-11-30T17:47:57+5:302017-11-30T18:01:08+5:30
पैगंबर जयंतीनिमित्त जुने नाशिकमधून जुलूस (मिरवणूक) काढण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली जुलूसला सुरुवात होणार आहे.
नाशिक : नाशिक : इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद-ए-मिलादचा सण येत्या शनिवारी (दि. २) शहरात साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर शहराती विविध मुस्लीमबहुल उपनगरांमध्ये पैगंबर जयंतीची जय्यत तयारी पाहावयास मिळत आहे. विविध सामाजिक संस्था व मित्रमंडळांकडून आपआपला परिसर सजविला जात असून, मशिदींवरही आकर्षक रोषणाई करण्यात आल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळत आहे.
दरवर्षी इस्लामी कालगणनेतील ‘रबीऊल अव्वल’ या उर्दू महिन्याच्या १२ तारखेला पैगंबर जयंती साजरी केली जाते. यावर्षीदेखील शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ठिकठिकाणी प्रवचन तसेच पैगंबरांवर आधारित स्तुतीपर काव्य स्पर्धा (नात-ए-पाक) होणार आहेत. सलग बारा दिवसीय प्रवचनमाला वडाळारोडवरील शहीद अश्पाकउल्लाखान चौकातील मैदानात सुरू आहे. तसेच शनिवारी जुने नाशिक परिसरात सामूहिक अन्नदानाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पैगंबर जयंतीनिमित्त मुस्लीम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, समाजबांधवांनी आपली घरे, दुकाने व परिसर रोषणाईने सजविला आहे. ठिकठिकाणी पैगंबरांनी दिलेला मानवतेचा व एकात्मतेचा संदेश व मदिना शरीफच्या प्रतिकृतींचे फलक उभारले जात आहेत. तसेच लोकप्रतिनिधींकडून शुभेच्छा फलक लावण्याचीही चढाओढ सुरू झाली आहे.
वडाळागाव, जुने नाशिक, देवळाली कॅम्प, देवळालीगाव, नाशिकरोड, सातपूर, सिडको आदी परिसरात पैगंबर जयंतीनिमित्त उत्साहाचे वातावरण असून, परिसर विविध आकर्षक पद्धतीच्या रोषणाईने नटला आहे. हिरवे झेंडे, पताका, रोषणाई करून परिसर सुशोभित करण्यावर तरुणाईकडून भर दिला जात आहे. जुने नाशिकसह वडाळागाव परिसरातील सर्वच मशिदींवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
शनिवारी ‘जुलूस’
पैगंबर जयंतीनिमित्त जुने नाशिकमधून जुलूस (मिरवणूक) काढण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली जुलूसला सुरुवात होणार आहे. मिरवणुकीमध्ये सहभागी होणा-या मंडळांनी कुठल्याही प्रकारे डीजे साउंडचा वापर करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे खतीब यांनी जाहीर केलेल्या जुलूसच्या नियमावलीचे पालन करून शांततेत पैगंबर जयंती साजरी करण्याचे आवाहन विविध धर्मगुरूंनी केले आहे.