ईद-ए-मिलाद : नाशिकमध्ये अभूतपूर्व उत्साहात ‘जुलूस-ए-मुहम्मदी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 06:48 PM2018-11-21T18:48:16+5:302018-11-21T18:55:26+5:30

‘नारे तकबीर अल्लाहू अकबर’, ‘नारे रिसालत या रसूलअल्लाह’, ‘जश्न-ए- ईद-ए-मिलाद जिंदाबाद’चा जयघोष करीत मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मिरवणूक चौकमंडई येथून पारंपरिक मार्गाने हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांच्या बडी दर्गाच्या प्रांगणात पोहचली.

Eid-e-Milad: 'procession-e-mohamadhi' in unprecedented excitement in Nashik | ईद-ए-मिलाद : नाशिकमध्ये अभूतपूर्व उत्साहात ‘जुलूस-ए-मुहम्मदी’

ईद-ए-मिलाद : नाशिकमध्ये अभूतपूर्व उत्साहात ‘जुलूस-ए-मुहम्मदी’

Next
ठळक मुद्देसहभागी मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून शिस्तबध्द संचलन दुरूदोसलाम, नात-ए-रसूलचे पठण पहाटेपासून मशिदींमध्ये धार्मिक कार्यक्रममानवजातीच्या कल्याणासाठी तसेच देशाच्या प्रगतीसाठी विशेष दुआ

नाशिक :इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती (ईद-ए-मिलाद) शहर व परिसरात अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. जुने नाशिकमधून बुधवारी (दि.२१) ‘जुलूस-ए-मुहम्मदी’ची मुख्य भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत मोठ्या संख्येने मुस्लीमबांधव सहभागी झाले होते. मिरवणूक मार्गावरील आकर्षक सजावटीने लक्ष वेधून घेतले.
ईद-ए-मिलाद हा सण मुस्लीम बांधवांकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. दरवर्षी यानिमित्ताने मशिदींसह घरे, दुकाने व परिसरात सजावट करण्यात येते. मागील आठवडाभरापासून शहरातील मुस्लीम बहुल भागात लगबग पहावयास मिळत होती. दुपारी पावणेचार वाजता शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली मिरवणुकीला चौकमंडई येथील जहांगीर मशिदीपासून उत्साहात प्रारंभ करण्यात आला. यावेळी खासदार हेमंत गोडसे, देवयानी फरांदे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी खतीब व शहर-ए-काझी सय्यद मोईजोद्दीन, मौलाना हाफीज अब्दुल जब्बार, हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर खतीब यांनी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी तसेच देशाच्या संरक्षण तथा प्रगतीसाठी विशेष दुआ मागितली.

‘नारे तकबीर अल्लाहू अकबर’, ‘नारे रिसालत या रसूलअल्लाह’, ‘जश्न-ए- ईद-ए-मिलाद जिंदाबाद’चा जयघोष करीत मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मिरवणूक चौकमंडई येथून पारंपरिक मार्गाने हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांच्या बडी दर्गाच्या प्रांगणात पोहचली. खतीब यांच्यासह पहिले मंडळ संध्याकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान दाखल झाले. मिरवणूक रात्री नऊ वाजेपर्यंत जुने नाशिक भागातून सुरू होती. अखेरचे मंडळ रात्री उशिरा सुमारे साडेनऊच्या सुमारास दर्ग्यात पोहचले. अग्रभागी खतीब यांची जीप होती. तसेच मीर मुख्तार अशरफी ध्वनिक्षेपकावरून पैगंबर यांच्या शिकवणीवर प्रकाश टाकत होते. मदरसा सादिकुल उलूम, गौस-ए-आझमचे विद्यार्थी पठाणी कुर्ता परिधान क रून पारंपरिक पोशाखात सहभागी झाले होते. सहभागी मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून शिस्तबध्द पध्दतीने संचलन करत दुरूदोसलाम, नात-ए-रसूलचे पठण केले जात होते. मिरवणुकीनिमित्त दुपारी साडेतीन वाजेपासून द्वारका, सारडा सर्कल, गंजमाळ सिग्नल, भद्रकाली बाजाराकडून येणारी वाहतूक पोलिसांनी वळविली होती.



पहाटेपासून मशिदींमध्ये धार्मिक कार्यक्रम
बुधवारी पहाटेच्या नमाजपठणानंतर मशिदींमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. शहरातील मशिदी, मदरशांमध्ये सामूहिक कुराणपठण, पैगंबरांवर अधारित काव्यपठण, दरुदोसलामचे पठण करण्यात आले. पैगंबर जयंतीनिमित्त जुने नाशिकसह विविध उपनगरांमध्ये सकाळपासून उत्साहाचे वातावण पहावयास मिळाले.

Web Title: Eid-e-Milad: 'procession-e-mohamadhi' in unprecedented excitement in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.