उर्दू महिना ‘रबिऊल अव्वल’चे मंगळवारी चंद्रदर्शन घडल्याने शनिवारी साजरी होणार ‘ईद-ए-मिलाद’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 12:44 PM2017-11-25T12:44:53+5:302017-11-25T12:57:00+5:30
संपूर्ण जगाला मानवतेची शिकवण देणारे इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस दरवर्षी ‘१२ रबिऊल अव्वल’ला साजरा केला जातो. यानिमित्त मुस्लीम बांधव आपली घरे, दुकाने व परिसरात सजावट करतात. विद्युतर रोषणाईसह हिरवे झेंडे, पताका लावून परिसर सजविला जातो.
नाशिक : इस्लामी कालगणनेतील रबिऊल अव्वल या ऊर्दू महिन्याच्या १२ तारखेला ‘ईद-ए-मिलाद’ अर्थात पैगंबर जयंती सर्वत्र साजरी करण्याची पारंपरिक प्रथा आहे. दिनदर्शिकेनुसार शुक्रवारी (दि.१) शासकिय सुटी पैगंबर जयंतीनिमित्त प्रसिध्द करण्यात आली असली तरी पैगंबर जयंती यावर्षी येत्या शनिवारी (दि.२) साजरी करण्याचा निर्णय नाशिक विभागीय सुन्नी सीरत मरकजी समितीसह राज्याच्या मुंबई येथील समितीनेही घेतला आहे. कारण उर्दू महिन्याचे चंद्रदर्शन गेल्या सोमवारी ऐवजी मंगळवारी घडले. त्यामुळे एक दिवस उशीरा रबिऊल अव्वल महिन्याला आरंभ झाला.
संपूर्ण जगाला मानवतेची शिकवण देणारे इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस दरवर्षी ‘१२ रबिऊल अव्वल’ला साजरा केला जातो. यानिमित्त मुस्लीम बांधव आपली घरे, दुकाने व परिसरात सजावट करतात. विद्युतर रोषणाईसह हिरवे झेंडे, पताका लावून परिसर सजविला जातो. त्यामुळे मुस्लीम बहुल परिसरात उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण पहावयास मिळते. याबरोबरच विविध सामाजिक मंडळ व संस्थांकडून समाजप्रबोधन करणारे सामाजिक तथा धार्मिक देखावेही सादर केले जातात. तसेच विविध शहरांमधून सकाळी किंवा दुपारी ‘जुलूस’ अर्थात पैगंबर जयंतीची मिरवणूकांचे आयोजन केले जाते.
येत्या शनिवारी नाशिकमधून शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली मुख्य मिरवणूक दूपारी तीन वाजता आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, मुस्लीम बांधवांकडून घरांमध्ये खीर खाद्यपदार्थावर फातिहा पठण केले जाते. नाशिकमध्ये वडाळारोड येथे एका धार्मिक संस्थेकडून दहा दिवसीय प्रवचनमालाही सुरू करण्यात आली आहे. शहरातील बाजारपेठेत सजावटीचे विविध धार्मिक साहित्य उपलब्ध झाले आहेत. अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपलेल्या पैगंबर जयंतीमुळे तयारीला वेग आला आहे.
डीजेमुक्त मिरवणूक; डीजेवर बंदी
गेल्या वर्षाप्रमाणे यावर्षीदेखील पैगंबर जयंतीनिमित्त काढण्यात येणारा शहरातील जुलूस डीजेमूक्त राहणार आहे. मिरवणूकीत सहभागी होणाºया मंडळांनी याबाबत खबरदारी घेऊन डीजे साऊंड सिस्टीमसह सहभाग घेऊ नये, असे आवाहन खतीब यांनी केले आहे. डीजे घेऊन सहभागी होणाºया मंडळांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई झाल्यास संबंधित मंडळाचे पदाधिकारी त्यास जबाबदार राहतील असे आयोजक सुन्नी मरकजी सीरत समितीने स्पष्ट केले आहे.