‘ईद-ए-मिलाद’ची जय्यत तयारी उत्साह : रोषणाईने उजळला जुने नाशिक परिसर; घरोघरी सजावटीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 12:00 AM2017-12-01T00:00:29+5:302017-12-01T00:11:20+5:30
हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद-ए-मिलादचा सण येत्या शनिवारी (दि. २) शहरात साजरा केला जाणार आहे.
नाशिक : हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद-ए-मिलादचा सण येत्या शनिवारी (दि. २) शहरात साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध उपनगरांमध्ये पैगंबर जयंतीची जय्यत तयारी पाहावयास मिळत आहे. विविध सामाजिक संस्था व मित्रमंडळांकडून आपआपला परिसर सजविला जात असून, मशिदींवरही आकर्षक रोषणाई करण्यात आल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.
दरवर्षी इस्लामी कालगणनेतील ‘रबीऊल अव्वल’ या उर्दू महिन्याच्या १२ तारखेला पैगंबर जयंती साजरी केली जाते. यावर्षीदेखील शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ठिकठिकाणी प्रवचन तसेच पैगंबरांवर आधारित स्तुतीपर काव्य स्पर्धा (नात-ए-पाक) होणार आहेत. सलग बारा दिवसीय प्रवचनमाला वडाळारोडवरील शहीद अश्पाकउल्लाखान चौकातील मैदानात सुरू आहे. तसेच शनिवारी जुने नाशिक परिसरात सामूहिक अन्नदानाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पैगंबर जयंतीनिमित्त मुस्लीम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, समाजबांधवांनी आपली घरे, दुकाने व परिसर रोषणाईने सजविला आहे. ठिकठिकाणी पैगंबरांनी दिलेला मानवतेचा व एकात्मतेचा संदेश व मदिना शरीफच्या प्रतिकृतींचे फलक उभारले जात आहेत. तसेच लोकप्रतिनिधींकडून शुभेच्छा फलक लावले जात आहेत. वडाळागाव, जुने नाशिक, देवळाली कॅम्प, देवळालीगाव, नाशिकरोड, सातपूर, सिडको आदी परिसरात पैगंबर जयंतीनिमित्त उत्साहाचे वातावरण असून, परिसर विविध आकर्षक पद्धतीच्या रोषणाईने नटला आहे. हिरवे झेंडे, पताका, रोषणाई करून परिसर सुशोभित करण्यावर भर दिला जात आहे. जुने नाशिकसह वडाळागाव परिसरातील सर्वच मशिदींवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. ईद-ए-मिलाद अर्थात पैगंबर जयंती अवघ्या एका दिवसावर येऊ न ठेपली आहे. यानिमित्त जुने नाशिकसह परिसरात सजावटीच्या कामाला वेग आला आहे. यासाठी लागणारे विविध प्रकारचे आकर्षक हिरवे झेंडे, पताका, चमकी, विद्युत माळा आदी सजावटीच्या साहित्याने जुन्या नाशकातील बाजारपेठ गजबजली आहे. जुने नाशिकसह मेनरोड परिसरात विद्युत साहित्यविक्रीच्या दुकानांवर नागरिकांची खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. जुने नाशिक भागात जयंतीचा उत्साह पहावयास मिळत असून, ठिकठिकाणी देखावे उभारणी व सजावटीच्या कामाला वेग आला आहे. रात्री उशिरापर्यंत परिसरात तरुणांकडून सजावटीवर भर दिला जात असल्याचे चित्र आहे.