‘ईद ए मिलाद’ सर्वत्र उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2021 01:51 AM2021-10-20T01:51:13+5:302021-10-20T01:55:35+5:30
इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्मोत्सव (ईद-ए-मिलाद) शहर व परिसरात उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. शहर ए खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक केवळ मोजक्या काही धर्मगुरूंनी मंगळवारी (दि.१९) ‘जुलूस’मध्ये सहभाग घेतला.
नाशिक : इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्मोत्सव (ईद-ए-मिलाद) शहर व परिसरात उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. शहर ए खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक केवळ मोजक्या काही धर्मगुरूंनी मंगळवारी (दि.१९) ‘जुलूस’मध्ये सहभाग घेतला.
इस्लामी कालगणनेतील ‘रबीऊल अव्वल’ महिन्याच्या १२ तारखेला प्रेषित मुहम्मद पैगंबर यांची जयंती दरवर्षी साजरी केली जाते. मागील दोन वर्षांपासून सर्व सण-उत्सवांप्रमाणे ईद ए मिलादवर सुद्धा कोरोनाचे सावट होते. कोरोनाची लाट नियंत्रणात येताच शासनाने निर्बंध शिथिल केले. त्यानंतर प्रथमच मुस्लीम बांधवांचा हा मोठा सण आला. यामुळे मंगळवारी समाजबांधवांमध्ये अधिक उत्साह पहावयास मिळाला. मुस्लीमबहुल मोहल्ले, घरे, दुकाने आकर्षक सजावट व रोषणाईने उजळून निघाली. सर्वत्र उत्साह अन चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. ठिकठिकाणी पवित्र धार्मिक स्थळ ‘मदिना शरीफ’च्या प्रतिकृती उभारून धार्मिक देखावे सादर करण्यात आले.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या परवानगीने शहरात मर्यादित स्वरूपात केवळ परंपरा राखण्याच्या उद्देशाने ‘जुलूस-ए-मुहम्मदी’ची मिरवणूक काढण्यात आली. जुने नाशिकमधील चौक मंडई येथील जहांगीर मशीद येथून दुपारी तीन वाजता जुलूसला प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी केवळ पाच प्रमुख वाहनांमध्ये प्रत्येकी पाच धर्मगुरू होते. वाहनांना इस्लामी ध्वज तसेच फुलांचे हार, फुगे लावून सजविण्यात आले होते. अग्रभागी खुल्या जीपमध्ये शहर ए खतीब, शहर ए काझी सय्यद मोईजोद्दीन, मौलाना मेहबूब आलम हे विराजमान होते. त्यांच्या पाठीमागील वाहनांत केवळ प्रत्येकी पाच धर्मगुरु होते. पारंपरिक पद्धतीने फातिहा पठण करत जुलूसला सुरुवात झाली. जुलूस मार्गावर येणारे रस्ते बॅरेकेडिंग करून बंद करण्यात आले होते. तसेच संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त होता. सर्वत्र शांततेत उत्साहात ईद ए मिलाद साजरी केली गेली.
---इन्फो---
‘जुलूस’चा असा होता मार्ग
चौक मंडई, बागवानपुरा, भोई गल्ली, कथडा, शिवाजी चौक, आझाद चौक, चव्हाटा, नाईकवाडीपुरा, बुधवारपेठ, आदमशाह चौक, काझीपुरा, मुलतानपुरा, बुरुड गल्ली, कोकणीपुरा, महात्मा फुले मंडई, खडकाळी मार्गे शहीद अब्दुल हमीद चौकातून पिंजारघाट रस्त्याने बडी दर्गा.
जुलूसच्या मार्गावर पताका आणि स्वागतकमानी लावण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी लावण्यात आलेले लेझर लाइट मिरवणूक मार्गाची शोभा वाढविणारे ठरले. जुलूसच्या मार्गावर विविध सामाजिक संघटनांच्या वतीने धर्मगुरुंचे प्रातिनिधीक स्वागत करण्यात आले.
---इन्फो----
‘कोरोनाचे उच्चाटन होवो; विश्वात शांतता नांदो’
कोरोनाचे संपूर्ण जगातून समूळ उच्चाटन होवो, विश्वात शांतता नांदो. .. भारतावर येणारे सर्व संकट टळो, सर्वत्र सुख शांती कायम राहो, अशी प्रार्थना धर्मगुरूंनी ईद-ए-मिलादच्या जुलूस समारोपप्रसंगी बडीदर्गामध्ये केली. यावेळी बडी दर्गा शरीफमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.