बकरी ईदचे नमाजपठण आपआपल्या घरीच करा : नांगरे पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 08:07 PM2020-07-29T20:07:51+5:302020-07-29T20:08:31+5:30
सामुहिकरित्या धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनावर राज्य सरकारकडून पुर्णत: बंदी घालण्यात आली आहे.
नाशिक : कोव्हिड-१९ अर्थात कोरोना संक्रमणाचा फैलाव शहर व परिसरात अधिक वेगाने होत आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्तालय हद्दीत समाजबांधवांनी सामुहिकरित्या ईदगाह मैदान किंवा मशिदींमध्ये एकत्र न येता आपआपल्या घरीच नमाजपठण करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केले.
बकरी ईद (ईद-ऊल अज्हा) येत्या शनिवारी (दि.१) शहरात साजरी केली जाणार आहे. यावर्षी रमजान ईदप्रमाणेच बकरी ईदवरदेखील कोरोनाचे गडद सावट आहे. सध्या अनलॉकची स्थिती जरी असली तरी सामुहिकरित्या धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनावर राज्य सरकारकडून पुर्णत: बंदी घालण्यात आली आहे. यानिमित्ताने नांगरे पाटील यांनी शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयुक्तालयात बुधवारी (दि.२९) मुस्लीम धर्मगुरूं सह जुने नाशिक, वडाळागाव भागातील काही मशिदींचे विश्वस्तांची बैठक बोलविली होती. यावेळी नांगरे पाटील यांनी बकरी ईदच्या संदर्भाने राज्य शासनाकडून आलेल्या नियमावली व आदेशाची माहिती दिली. सामुहिकरित्या कोठेही नमाजपठणासाठी गर्दी होणार नाही, याबाबत खबरदारी घ्यावी तसेच बाजारातसुध्दा खरेदी-विक्रीकरिता झुंबड उडणार नाही, याबाबत काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी धर्मगुरूंकडून नमाजपठण व स्लाटर हाऊसची मागणी ठेवण्यात आली; मात्र शासनाच्या आदेशानुसार या मागण्यांना कुठल्याहीस्तरावर मान्यता देता येणार नसल्याचे नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी उपायुक्त अमोल तांबे, विजय खरात, सहायक आयुक्त अशोक नखाते, मंगलसिंह सुर्यवंशी, यांच्यासह मौलाना मुफ्ती सय्यद आसिफ इकबाल, रजा अकादमीचे एजाज रजा मकरानी, सलीम पटेल, एकबाल पटेल, लालाभाई शाह, निजामुद्दीन कोकणी आदि उपस्थित होते.
ईदगाहवरील सोहळा रद्द
शहरातील शहाजहॉँनी ईदगाह मैदानावर होणाऱ्या बकरी ईदच्या नमाजपठणाचा सामुहिक सोहळा रद्द करण्यात आला आहे. नागरिकांनी आपआपल्या घरांमध्येच नमाजपठण करावे. शासनाच्या कुठल्याही नियमांचा भंग होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन हिसामुद्दीन खतीब यांनी समाजाला केले आहे.