नाशकात अकरावी प्रवेशासाठी साडेआठ हजार विद्यार्थ्यांनी निवडले भाग दोनचे पर्याय ; २९ हजार अर्जांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 07:25 PM2020-08-13T19:25:05+5:302020-08-13T19:29:52+5:30
नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी आॅनलाईन अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली असून गुरुवारी सायंकाळपर्यंत सुमारे ८ हजार ५५२ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्जाचा भाग दोन भरतानाच महाविद्यालय व विद्याशाखेचे पर्याय निवडले आहेत.
नाशिक : महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी आॅनलाईन अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली असून गुरुवारी सायंकाळपर्यंत सुमारे ८ हजार ५५२ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्जाचा भाग दोन भरतानाच महाविद्यालय व विद्याशाखेचे पर्याय निवडले आहेत. तर या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी जिल्हाभरातून तब्बल २९ हजार ६०६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील ६० उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यलायांमधील २५ हजार २७० जागांसाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया केंद्रीभूत पद्धतीने प्रक्रिया राबविली जात आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना महाविद्यालय, शाखा निवडीसाठी आवश्यक असलेला भाग दोन भरण्याची प्रक्रिया बुधवार (दि.१२)पासून सुरू झाली असून आतापार्यंत ८ हजार ५५२ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्जाचा भाग दोन भरताना त्यांच्या पसंतीची विद्याशाखा निवडून महाविद्यालयांचे पर्याय निवडले आहे. पहिल्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवून अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालय व शाखा निवडीसाठी २२ आॅगस्टपर्यंत आॅनलाइन अर्जाचा भाग दोन भरण्याची मुदत असेल. त्यानंतर ३० आॅगस्टला पहिली गुणवत्ता यादी (मिरीट लिस्ट) जाहीर केली जाणार आहे. अकरावी प्रवेशप्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या महाविद्यालयांचा पसंतीक्रम व शाखा निवडीकरिता अर्जाचा भाग दोन असल्याने, या प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागून होते. शिक्षण विभागाने प्रवेशाकरिताचे वेळापत्रक जारी केले आहे. त्यानुसार यापूर्वी नोंदणी करत अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग दोन भरता येणार आहे.