शहरात एकाच दिवसात आठ कोरोनाबाधितांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 11:10 PM2020-06-15T23:10:07+5:302020-06-16T00:21:25+5:30
नाशिक : जिल्ह्यात मालेगावमधील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असताना शहरात बाधित आणि मृत्यूचे प्रमाणदेखील वाढत आहे. सोमवारी (दि.१५) एकाच दिवसात आठ जणांचा मृत्यू कोरोनामुळेच झाल्याचे अहवाल प्राप्त झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याशिवाय शहरात दिवसात भरात तब्बल ६५ रुग्ण आढळल्याने बाधितांच्या संख्येने सातशेचा टप्पा पार केला आहे. शहरात एकूण ७३८ रुग्ण आढळले आहे.
नाशिक : जिल्ह्यात मालेगावमधील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असताना शहरात बाधित आणि मृत्यूचे प्रमाणदेखील वाढत आहे. सोमवारी (दि.१५) एकाच दिवसात आठ जणांचा मृत्यू कोरोनामुळेच झाल्याचे अहवाल प्राप्त झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याशिवाय शहरात दिवसात भरात तब्बल ६५ रुग्ण आढळल्याने बाधितांच्या संख्येने सातशेचा टप्पा पार केला आहे. शहरात एकूण ७३८ रुग्ण आढळले आहे.
शहरात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी असलेले निर्बंध शिथिल करण्यात आले असून, जनजीवन सुरळीत करण्याचे शासनाचे धोरण असताना आता मात्र कोरोनाचा उद्रेक वाढला असून, शहरात एकाच दिवसात आठ जणांचा धक्कादायकरीत्या मृत्यू झाल्याने महापालिकेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. गेल्या चोवीस तासात झालेले सात कोरोनाबाधितांचे मृत्यू खोडेनगर, महादेववाडी, बुरूड गल्ली, पारिजातनगर, नाईकवाडी पुरा, खडकाळी, जोगवाडा, वडाळा या भागातील रुग्णांचे आहेत.
नाशिक शहरात पहिला रुग्ण ५ एप्रिल रोजी आढळला होता. त्यानंतर शहरातील परिस्थिती नियंत्रणात असताना गेल्या मे महिन्यांच्या मध्यानंतर मात्र शहरात रुग्ण वाढत गेली आणि आता तर ती आरोग्य यंत्रणेच्या हाताबाहेर गेली आहे. शहरात दररोज किमान ४० ते ५० रुग्ण आढळत असून, रुग्णसंख्या आणि मृत्यूदराच्या बाबतीत नाशिक शहराने मालेगावला मागे टाकले आहेत. शहरात दररोज एक किंवा दोन जणांचे कोरोनामुळे मृत्यू होत असून, गेल्या आठवड्यात एकाच दिवशी चार जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सोमवारी (दि.१२) एकाच दिवसात प्राप्त झालेल्या अहवालानुसार सात जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहरात जुने नाशिक आणि वडाळा भागात सर्वाधिक मृत्यू आत्तापर्यंत झाले आहेत. नाईकवाडी पुरा येथील अजमेरी मस्जिद भागात एका ५२ वर्षीय महिलेला कोरोना संसर्ग झाल्याचा अहवाल ७ जून रोजी प्राप्त झाला होता. तिचा सोमवारी (दि. १५) मृत्यू झाला, तर खडकाळी भागात ६० वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळेच रविवारी मृत्यू झाला आहे.
बुरूड गल्ली येथील ६० वर्षीय वृद्धेचा कोरोना बाधित असल्याचा अहवाल रविवारी (दि.१७) प्राप्त झाला आणि सोमवारी तिचा मृत्यू झाला. वडाळा येथील कोरोनाबाधित ६५ वर्षीय वृद्धाचा रविवारी मृत्यू झाला. याच भागात वडाळा मार्गावरील खोडेनगर येथील ८० वर्षीय वृद्धाला कोरोना झाल्याचा अहवाल ४ जून रोजी प्राप्त झाला होता. मात्र, उपचार सुरू असताना रविवारी (दि.१४) त्या वृद्धाचा मृत्यू झाला. सातपूर येथील महादेववाडीत एका ६० वर्षीय वृद्धाला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल रविवारी प्राप्त झाला आणि रविवारीच त्या वृद्धेचा मृत्यू झाला.
पारिजातनगर येथील एका वृद्धाचाही कोरोनामुळे सोमवारी मृत्यू झाला आहे. त्यामुळे नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३९ झाली आहे, तर एकाच दिवसात ६५ बाधित झाले असून, त्यामुळे बाधितांची संख्या ७३८ झाली आहे.
-----------------------
\दुर्लक्ष : नियमांकडे फिरविली पाठ
गेल्या ३० मेपर्यंत शहरात निर्बंध मोठ्या प्रमाणात होते. त्यावेळी शहरात बाधितांची संख्या २३४ होती, तर दहा जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांत बाधितांची संख्या ५१५ ने वाढली आहे. त्यामुळे आता कोरोना संसर्ग टाळण्यासाठी काटेकोर आरोग्य सुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक झाले आहे.
----------------
शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी हे महापालिकेने आत्तापर्यंत केलेल्या स्क्रिनिंग आणि तपासणीत आढळलेले संशयित यांच्या नमुना तपासणीचा अहवाल आता प्राप्त झाले आहेत. कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वाढत असले तरी मृत्यू रोखणे हेच सर्वाधिक आव्हानात्मक आहे. मात्र, आता निर्बंध शिथिल झाल्याने लोकांची वाढती गर्दी कोरोनाला निमंत्रण देणारी ठरत आहे. नागरिकांनी यासंदर्भात आरोग्य नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
- डॉ. राजेंद्र त्र्यंबके, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका