नाशिककरांना आठ दिवसांचा अल्टिमेटम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:15 AM2021-03-27T04:15:34+5:302021-03-27T04:15:34+5:30
नाशिक : कोरोना नियंत्रणासाठी जिल्ह्यात अनेक निर्बंध लागू असतानाही रुग्णसंख्या वाढतच असल्याने येत्या आठ दिवसांत रुग्णसंख्या नियंत्रणात आली नाही, ...
नाशिक : कोरोना नियंत्रणासाठी जिल्ह्यात अनेक निर्बंध लागू असतानाही रुग्णसंख्या वाढतच असल्याने येत्या आठ दिवसांत रुग्णसंख्या नियंत्रणात आली नाही, तर नाइलाजाने निर्बंध अधिकाधिक कठोर करावे लागतील, असा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अल्टिमेटम देण्यात आला असून अधिकाऱ्यांना याबाबत कडक शब्दांत समजही दिली आहे.
जिल्ह्यातील रुग्णवाढीचा वेग चिंतेत टाकणारा असल्याने पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत भुजबळ यांनी कठोर निर्णयाचे संकेतही दिले. कारोना नियंत्रणात आणण्यासाठी निर्बंध असतानाही त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याने गर्दी आणि त्यातून रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसते. रुग्णवाढीचा वेग कमी करण्यासाठी सर्वांनाच प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यामुळे येत्या आठ दिवसांत रुग्णसंख्येचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. रुग्णवाढीचा वेग असाच राहिला तर नाइलाजाने लॉकडाऊनसारखा निर्णयदेखील घ्यावा लागेल, असा इशारादेखील पालकमंत्र्यांनी दिला.
पुढील आठवड्यात कॅबिनेटसमोर जिल्ह्यातील परिस्थिती मांडणार असल्याचे भुजबळ यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर २ एप्रिल रोजी पुन्हा बैठक घेऊन पुढील निर्णयाची घोेषणा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
गेल्या २५ फेब्रुवारीला २४०९ इतकी रुग्णसंख्या असताना २५ मार्च रोजी म्हणजेच महिनाभरात संख्या १९ हजारांच्या पुढे गेल्याने रुग्णवाढीचा वेग लक्षात येतो. रुग्णवाढीचा हा वेग राज्यात पाचव्या क्रमांकावर असल्याचे सांगून कोरोनाची ही दुसरी लाट असल्याने अधिक दक्षता घ्यावी लागणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील सभागृहात झालेल्या बैठकीप्रसंगी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकरी लीना बनसोड, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, मनपा आयुक्त कैलास जाधव उपस्थितीत होते.
--इन्फो--.
...तर अधिकारीही हलवू
जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधासाठी संबंधित अधिकारी कामकाज करणार नसतील तर आणि केवळ एकाच जागी बसून राहणार असतील तर त्यांना हलविले जाईल. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना आपली जबाबदारी पार पाडली नाही तर त्यांच्यावर कारवाई निश्चित असल्याचा इशाराही पालकमंत्री भुजबळ यांनी दिला.
--इन्फो--
उपचाराचे दर, ऑडिटर्सचा क्रमांक दर्शनी भागावर लावा
रुग्णांची आर्थिक अडवणूक होत असेल तर अशा रुग्णालयांवर कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. रुग्णालयाच्या दर्शनी भागावर उपचाराचे दर तसेच संबंधित ऑडिटर्सचा भ्रमणध्वनी क्रमांक दर्शनी भागावर लावण्याची सक्ती करण्याच्या सूचना मनपा आयुक्तांना करण्यात आली.
--इन्फो--
होम क्वारंटाइन करण्यात आलेले रुग्ण खरोखर क्वारंटाइन आहेत का? त्यांची घरात विलगीकरणाची व्यवस्था नसल्याने त्यांच्याकडून इतर अनेक बाधित झाल्यामुळे रुग्णसंख्या वाढत गेली. केेवळ हेच नव्हे तर प्रसाराची इतरही कारणे आहेत. मात्र, विलगीकरणाच्या नियमाकडे गांभीर्याने पाहिले गेले नसल्याने प्रसारात भर पडली.
--कोट--
लॉकडाऊन नकोच
लॉकडाऊन करण्याची आपली मानसिकता नाही. त्यातून सर्वसामान्य नागरिक, मोलमजुरी करणाऱ्या गोरगरिबांचे मोठे नुकसान होते; परंतु निर्बंधाचे पालन केले जाणार नसेल आणि गर्दी होतच राहिली तर नाइलाजास्तव कठोर निर्णय घ्यावा लागेल.
लोक अजूनही जबाबदारी घ्यायला तयार नाहीत, त्यांना सांगूनही समजत नसेल तर अप्रिय निर्णय घेण्याशिवाय पर्याय नाही.
-छगन भुजबळ, पालकमंत्री