सिन्नरमधील खूनप्रकरणी आठ ताब्यात: दोन गटांत हाणामारी; परिसरामध्ये तणाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 16:16 IST2025-02-16T16:16:23+5:302025-02-16T16:16:39+5:30
एमआयडीसी पोलिसांनी २७ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला तर त्यातील ८ जणांना पोलिसांनी अटक केली.

सिन्नरमधील खूनप्रकरणी आठ ताब्यात: दोन गटांत हाणामारी; परिसरामध्ये तणाव
सिन्नर : जुन्या भांडणाची कुरापत काढून तालुक्यातील दातली येथे दोन गटांत शुक्रवारी रात्री तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत युवकाच्या अंगावर स्कॉर्पिओ कार घालून कोयता, लाठ्या-काठ्या, लोखंडी गज यांचा वापर झाल्याने दातली येथील सागर मारुती भाबड या ३४ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी २७ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला तर त्यातील ८ जणांना पोलिसांनी अटक केली.
दोन गटांत झालेल्या हाणामारीत जगन्नाथ नरहरी भाबड (५०), अक्षय म्हाळू भाबड (२८), म्हाळू नरहरी भाबड (५३), संकेत म्हाळु भाबड (२२), कांताबाई नवनाथ कांगणे, रखमाबाई म्हाळू भाबड सर्व रा. दातली, ता. सिन्नर आणि ओमकार विजय डोमाडे (२१) रा. देशवंडी हे जखमी झाले आहेत.
दोन दिवसांपूर्वीच वडिलांची आत्महत्या
मयत सागर भाबड याचे वडील मारुती भाबड यांना मेंढी येथील व्यसनमुक्ती केंद्रात ठेवण्यात आले होते. बुधवारी सागरच्या वडिलांनी या केंद्रात आत्महत्या केली होती. वडीलांच्या मृत्यूला दोन दिवस उलटत नाही तोच मारहाणीत सागरचा मृत्यू झाला.
संशयित न्यायालयात हजर
गुन्हा दाखल झालेल्यांपैकी मीनानाथ सोमनाथ भाबड (३४), सोमनाथ भागूजी भाबड (७०), गोरखनाथ सोमनाथ भाबड (४५), अनिल रखमा भाबड (३३), सूरज गोरखनाथ भाबड (२१), शिवराम भागूजी भाबड (७६), गणेश रखमा भाबड (३२), निखील श्रीरंग भाबड (३०) सर्व रा. दातली, ता. सिन्नर या संशयितांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. शनिवारी दुपारी या सर्व अटक केलेल्या संशयितांना सिन्नर न्यायालयात हजर करण्यात आले.