आठ जखमी : लांडग्यांच्या टोळीने केली १४ शेळ्यांची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 02:57 PM2021-02-25T14:57:14+5:302021-02-25T14:59:09+5:30
बिबट हा वन्यप्राणी समुहाने फिरत नाही आणि समुहाने शिकारही करत नाही. एक किंवा दोन शेळ्या या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्या असत्या तर कदाचित बिबट हल्ला झाल्याची शक्यता होती; मात्र या हल्ल्यावरुन लांडगासदृश्य वन्यप्राण्याने समुहाने हल्ला केल्याचे प्रथमदर्शनी दिसते.
नाशिक :निफाड तालुक्यातील मौजे थेटाळे गावाच्या शिवारात एका वस्तीवर तारेच्या कुंपणामध्ये बंदीस्त असलेल्या शेळ्यांवर गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास लांडगासदृश्य वन्यप्राण्याच्या टोळीने हल्ला चढविला. लांडग्यांनी १४ शेळ्यांची शिकार करत आठ शेळ्यांना जखमी करून पळ काढल्याची घटना पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.
थेटाळे येथील शाहु दगु शिंदे यांची गट क्रमांक ५७/२मध्ये शेती आहे. याठिकाणी त्यांच्या वस्तीवर राजाराम तुळशीराम शेवरे हे शेळी पालनाचा व्यवसाय करतात. शेवरे यांच्या मालकीच्या शेळ्या येथील भुखंडावर एका तारेच्या कुंपणामध्ये बंदिस्त करुन नेहमीप्रमाणे रात्रीच्या वेळी ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास लांडगासदृश्य वन्यप्राण्यांच्या टोळीने सामुहिकरित्या हल्ला चढवुन शेळ्यांची शिकार केली. यावेळी या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात १४ शेळ्यांना आपला जीव गमवावा लागला तर ८ शेळ्या जखमी झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल बशील शेख यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. शेवरे यांच्याकडून शेळ्यांची माहिती घेत वनरक्षकांनी मृतावस्थेतील शेळ्यांच्या जखमांची पाहणी करत पंचनामा केला. तसेच आजुबाजुला वन्यप्राण्यांच्या पाऊलखुणा तपासून त्यानुसार हल्लेखोर हिंस्त्र वन्यप्राण्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती पुर्व वनविभगाच्या सुत्रांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी पुर्व वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत पशुधनाच्या झालेल्या हानीची नुकसानभरपाई शासननियमानुसार पशुमालकाला दिली जाईल, अशी माहिती शेख यांनी दिली.
बिबट्याच्या हल्ल्याची अफवा
बिबट हा वन्यप्राणी समुहाने फिरत नाही आणि समुहाने शिकारही करत नाही. एक किंवा दोन शेळ्या या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्या असत्या तर कदाचित बिबट हल्ला झाल्याची शक्यता होती; मात्र या हल्ल्यावरुन लांडगासदृश्य वन्यप्राण्याने समुहाने हल्ला केल्याचे प्रथमदर्शनी दिसते. लांडगा, कोल्हा यांसारखे वन्यप्राणी कळपाने राहून शिकार करतात, अशी माहिती पुर्व वनविभागाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली.