स्थायी समितीचे आठ सदस्य २६ फेब्रुवारीस नेमणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:16 AM2021-02-11T04:16:58+5:302021-02-11T04:16:58+5:30
नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीत एक सदस्य नियुक्त करण्यासाठी सत्तारूढ भाजपचा अखेर सुरू असलेला कायदेशीर खल संपला असून येत्या ...
नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीत एक सदस्य नियुक्त करण्यासाठी सत्तारूढ भाजपचा अखेर सुरू असलेला कायदेशीर खल संपला असून येत्या २६ फेब्रुवारीत या एक सदस्यासाठीच नव्हे तर नव्याने आठ सदस्य नियुक्तीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
गेल्यावर्षी महापौर सतीश कुलकर्णी यांनी महासभेच्या माध्यमातून पक्षीय तौलनिक बळानुसार सदस्य नियुक्त करताना शिवसेनेचा एक सदस्य कमी नियुक्त केला, असा आक्षेप घेण्यात आला हेाता. यासंदर्भात विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी उच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर गेल्याच महिन्यात त्यांची विनंती मान्य करून तसे आदेश देण्यात आले होते. मात्र, सत्तारूढ गट आणि प्रशासनाने यासंदर्भात वकिलांची मते मागविल्यानंतर दोन भिन्न मते प्राप्त झाली होती तरीही न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावेच लागणार हे उभय वकिलांचे मत झाल्याने अखेरीस महासभा घेण्याचे ठरविण्यात आले. आता १८ फेब्रुवारीला महापालिकेची नियमित महासभा हेाणार आहे. त्यानंतर स्थायी समितीच्या सदस्य नियुक्तीसाठी २६ फेब्रुवारीस विशेेष महासभा घेतली जाणार आहे.
स्थायी समितीच्या आठ सदस्य नियमानुसार २८ फेब्रुवारीस निवृत्त होणार आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशानानुसार शिवसेनेचा एक सदस्य नियुक्ती करण्यासाठी स्वतंत्र महासभा न घेता एकाचवेळी आठ सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. शिवसेनेच्या नव्या पक्षीय तौलनिक बळानुसार सदस्य नियुक्त केले जाणार आहे. त्यामुळे सेनेला एका जागेचा लाभ होणार आहे.