विसर्जनप्रसंगी आठ जणांचा मृत्यू
By admin | Published: September 17, 2016 12:17 AM2016-09-17T00:17:49+5:302016-09-17T00:26:24+5:30
जिल्ह्यात उत्सवावर शोककळा : लष्करी जवानाचाही समावेश
नाशिक : जिल्ह्यात विविध ठिकाणी गणेश विसर्जनादरम्यान आठ जणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना गुरुवारी (दि़ १५) घडल्या आहेत़ मृतांमध्ये सुटीवर आलेल्या आसाम रायफल्समधील लष्करी जवानाचाही समावेश आहे़
सिन्नर तालुक्यातील मुसळगावमधील एका साठवण बंधाऱ्यात गणपती विसर्जनासाठी गेलेला एकजण बुडत असताना पाहून लष्करी जवान संदीप सिरसाट याने पाण्यात उडी घेतली, मात्र या दोघांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने रामेश्वर शिवाजी सिरसाट (३१, कळवाडी, ता़ सिन्नर, जि़नाशिक), संदीप अण्णा सिरसाट (२५, कळवाडी, ता़सिन्नर, जि़ नाशिक) या दोघांचाही बुडून मृत्यू झाला़ साठवण बंधाऱ्यात युवक बुडाल्याची खबर पोलीसपाटील दीपक गाडेकर यांनी दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस निरीक्षक हरिभाऊ कोल्हे, हवालदार एन. एस. कुऱ्हाडे, तुषार मरसाळे, विनोद जाधव, तुळशीराम चौधरी, प्रवीण मरसाळे, सुशील साळवे यांनी धाव घेतली. गणेश विसर्जनासाठी आलेल्या भाविकांनी व एमआयडीसी पोलिसांनी बंधाऱ्यात शोधमोहीम राबविली. सुमारे अर्धा तासाने रामेश्वर ऊर्फ राहुलचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर तासभराने संदीपचा मृतदेह सापडला. दोघांवर सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. संदीप हा लष्करात आसाम येथे ४४ आसाम रायफल्समध्ये कार्यरत होता, तर रामेश्वर हा मुसळगाव औद्योगिक वसाहतीत कारखान्यात नोकरी करतो.
वाडीवऱ्हे पोलीस ठाणे हद्दीतील वालदेवी फाट्याजवळील खदानीत गणेश विसर्जनासाठी गेलेला नीलेश साईनाथ पाटील (वय २५, डीजीपीनगर, नाशिक) या युवकाचा बुडून मृत्यू झाला़
मालेगाव तालुक्यातील सुमित कांतीलाल पवार (वय १४, रा़ दाभाडी, ता़ मालेगाव, जि़ नाशिक) व सचिन लहू देवरे (वय १६, राख़डकी, ता़ मालेगाव, जि़ नाशिक) या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला़ गणेश विसर्जनासाठी गेलेले या दोघांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले़ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भूषण हरी कसबे (१७, रा़ माळेगाव, ता़ त्र्यंबकेश्वर, जि़ नाशिक़) व अमोल साहेबराव पाटील (रा़पिंपळद, ता़त्र्यंबकेश्वर, जि़नाशिक)या दोघा युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. योगेश्वर संकुलमध्ये गणरायाची स्थापना करण्यात आली होती. त्याच कॉलनीतील गणपतीचे विसर्जन करण्यासाठी भूषण गेला होता. गणेशमूर्ती बुडविण्याचा प्रयत्न करीत असताना त्याचा तळ्यात बुडून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह शोधण्यात जीवरक्षक यांना प्रयत्न करूनही अपयश आले. मात्र गणेशगाव येथील टीमने त्याचा मृतदेह शोधून पाण्यातून बाहेर काढला, तर गंगापूररोडवरील बेंडकुळे मळा येथे गणेश विसर्जनासाठी गेलेला रोशन रतन साळवे (बेंडकुळे मळा, गंगापूररोड, नाशिक) याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला़(प्रतिनिधी)