खिरवस खाल्ल्याने आठ जणांना विषबाधा खालप : ग्रामीण रुग्णालयात उपचार; चार वर्षाच्या बालकाचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 01:18 AM2018-03-02T01:18:37+5:302018-03-02T01:18:37+5:30
देवळा : तालुक्यातील खालप येथील एकाच कुटुंबातील पाच मुले, दोन महिला व एक पुरुष अशा आठ जणांनी गाईच्या दुधाचे खिरवस खाल्ल्याने विषबाधा झाली.
देवळा : तालुक्यातील खालप येथील एकाच कुटुंबातील पाच मुले, दोन महिला व एक पुरुष अशा आठ जणांनी गाईच्या दुधाचे खिरवस खाल्ल्याने विषबाधा झाली असून, त्यांच्यावर देवळा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विषबाधा झालेल्यांमध्ये एका चार वर्षाच्या बालकाचा समावेश असून, सर्वांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर काळे यांनी दिली. खालप, ता. देवळा येथील इंदिरानगर अदिवासी वस्तीत राहणाºया श्रीराम गंगाधर जाधव (४०) हे दिवसभराचे काम आटोपून घरी आले असता कुटुंबातील सदस्य हिरूबाई गंगाधर जाधव (५५), श्रीराम गंगाधर जाधव (४०), नेहा श्रीराम जाधव (१५), निकिता श्रीराम जाधव (१३), ओम श्रीराम जाधव (१२), साई श्रीराम जाधव (४), केदाबाई वामन साठे (४५) व राणी वामन साठे (१६) यांनी सकाळी तयार करून ठेवलेले गाईच्या दुधाचे खिरवस खाल्ले. त्यानंतर रात्री ८.३० वाजेच्या सुमारास सर्वांना मळमळ व उलटीचा त्रास जाणवू लागला. सदर घटना जाधव यांची पत्नी छाया यांनी आजूबाजूच्या नागरिकांना सांगितली असता त्यांना स्थानिक डॉक्टरांकडे उपचारासाठी दाखल केले. रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉ. समीर काळे यांनी सर्व रुग्णांवर वैद्यकीय उपचार केल्यानंतर प्रकृतीत सुधारणा होऊन सर्व सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले.