कुंभार्डेत बॅन्जोच्या आवाजाने बैल बिथरल्याने आठ जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 02:23 PM2018-02-20T14:23:59+5:302018-02-20T14:24:30+5:30
उमराणे : दवेळा तालुक्यातील कुंभार्डे येथे लग्न मांडवाच्या बैलगाडीला जुंपलेले बैल बॅन्जोच्या आवाजाने व जमलेल्या गर्दीमुळे अचानक बिथरल्याने नवरीच्या भावासह आठ जण जखमी झाले असुन यातील दोन जणांच्या अंगावर बैलगाडी गेल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.
उमराणे : दवेळा तालुक्यातील कुंभार्डे येथे लग्न मांडवाच्या बैलगाडीला जुंपलेले बैल बॅन्जोच्या आवाजाने व जमलेल्या गर्दीमुळे अचानक बिथरल्याने नवरीच्या भावासह आठ जण जखमी झाले असुन यातील दोन जणांच्या अंगावर बैलगाडी गेल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. कुंभार्डे येथील दादाजी विष्णू केदारे यांच्या मुलीचे लग्न असल्याने काल पारंपारिक पध्दतीने मांडव टाकण्याचा कार्यक्र म होता. सकाळी आठ ते नऊ वाजेच्या सुमारास गावातील मुख्य चौकातुन वाजतगाजत मांडव घराकडे घेऊन जाण्याच्या प्रथेनुसार बैलगाडी जुंपली होती. या कार्यक्र मासाठी आप्तेष्ठ नातेवाईकांसह भाऊबंद व गावातील नागरिक मोठ्या संख्येने चौकात उपस्थित होते. त्याचवेळी बॅन्जोचा आवाज व जमलेल्या गर्दीमुळे बैलगाडीला जुंपलेले बैल अचानक बिथरल्याने बैलगाडीसह आजुबाजुला सैरावैरा पळु लागल्याने जमलेल्या गर्दीतील म्हसु तुकाराम ठाकरे, सदाशिव भागा केदारे, हिरामण ठाकरे, नवरीचा भाऊ राहुल केदारे, देविदास ठाकरे, वैशाली देवरे, जयवंत निरभवणे,साहेबराव ठाकरे आदी जखमी झाले आहेत. त्यापैकी म्हसु ठाकरे व सदाशिव केदारे यांच्या अंगावरु न बैलगाडी गेल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच गावापासून जवळच असलेल्या उमराणे गावातुन उमराणे बाजार समितीची व वैद्यकीय विभागाची तसेच खाजगी रु ग्णवाहीका घटनास्थळी हजर होत जखमींना मालेगाव येथील खाजगी रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान घडलेल्या घटनेमुळे उशिरापर्यंत मांडव पडला नव्हता. शुभमंगल प्रसंगी अशी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. @