नाशिकरोडच्या आठ जलतरणपटूंचा राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 01:32 AM2018-10-20T01:32:11+5:302018-10-20T01:32:56+5:30
नागपूर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय जलतरण, वॉटरपोलो स्पर्धेत नाशिकरोड येथील राजमाता जिजाऊ जलतरण तलावावर सराव करणाऱ्या आठ जलतरणपटूंनी विविध वयोगटातील वेगवेगळ्या जलतरण प्रकारात सहभाग नोंदवित स्पर्धा पूर्ण केली.
नाशिकरोड : नागपूर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय जलतरण, वॉटरपोलो स्पर्धेत नाशिकरोड येथील राजमाता जिजाऊ जलतरण तलावावर सराव करणाऱ्या आठ जलतरणपटूंनी विविध वयोगटातील वेगवेगळ्या जलतरण प्रकारात सहभाग नोंदवित स्पर्धा पूर्ण केली. नाशिकरोड येथे झालेल्या जिल्हा आणि विभागस्तरीय शालेय जलतरण आणि वॉटरपोलो स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या जलतरणपटूंनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. यात यश सोनकांबळे, अथर्व भातखंडे, ओमकार ढेरिंगे, अरुल पंडित, संदेश दुनबळे, श्रवण कुंभार, श्रद्धा शिरसाट, पूर्वा पाटील या जलतरणपटूंचा समावेश होता. वेगवेगळ्या वयोगटातील या जलतरणपटूंनी विविध जलतरण प्रकारात सहभाग घेऊन चांगल्या वेळेची नोंद केली. हे सर्व जलतरणपटू नाशिकरोड येथे प्रशिक्षक गौरव तेजाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. तेजाळे यांनी गेल्या काही महिन्यांपासून नाशिकरोड येथील जलतरण तलावावर प्रशिक्षणास सुरुवात केली असून, अल्पकालावधीतच त्यांच्याकडे सराव करणारे जलतरणपटू राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत पोहचल्याने पालकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. स्पर्धकांना जलतरण तलावाच्या व्यवस्थापक माया जगताप, हरी सोनकांबळे, अनिल ढेरिंगे, घनश्याम कुवर यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. नाशिकरोडमधून जलतरणपटूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात निवड होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने स्पर्धकांचाही उत्साह दुणावला आहे.