आठ तालुक्यांत पीकपाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 01:44 AM2018-10-13T01:44:12+5:302018-10-13T01:44:40+5:30
जिल्ह्यात यंदा पावसाअभावी पिके धोक्यात आलेली असताना शासनाने तीनच तालुक्यांत पीककापणी प्रयोग घेण्याचे निर्देश दिल्यानंतर होणारी टीका लक्षात घेता आणखी पाच तालुक्यांचा त्यात समावेश करण्यात आला असून, या सर्व तालुक्यांमध्ये पिकांचे सत्यापन करण्यासाठी पाहणी करण्यात येणार आहे.
नाशिक : जिल्ह्यात यंदा पावसाअभावी पिके धोक्यात आलेली असताना शासनाने तीनच तालुक्यांत पीककापणी प्रयोग घेण्याचे निर्देश दिल्यानंतर होणारी टीका लक्षात घेता आणखी पाच तालुक्यांचा त्यात समावेश करण्यात आला असून, या सर्व तालुक्यांमध्ये पिकांचे सत्यापन करण्यासाठी पाहणी करण्यात येणार आहे.
मदत व पुनर्वसन खात्याने शुक्रवारी या संदर्भातील पत्र विभागीय आयुक्तांना पाठविले असून, त्यात नाशिक जिल्ह्यातील बागलाण, चांदवड, देवळा, इगतपुरी, मालेगाव, नांदगाव, नाशिक, सिन्नर या आठ तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यातील दहा टक्के गावांमध्ये पीक परिस्थितीचे सत्यापन करण्यात येणार आहे. गावातील प्रमुख पिकाची वाढ, सद्य:स्थिती, अंदाजे उत्पन्न याचा अहवाल छायाचित्रासह राज्य सरकारला पाठविण्यात येणार आहे. त्यावरून सरकार दुष्काळाबाबत निर्णय घेणार आहे. जिल्ह्णात यंदा ८२ टक्केच पाऊस झाला असून, पीक परिस्थिती वाईट झाली आहे. याशिवाय ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम आहे.