रेल्वेच्या ब्लाॅकमुळे आठ गाड्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 01:12 AM2021-12-18T01:12:54+5:302021-12-18T01:13:14+5:30
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात धावणाऱ्या आठ गाड्या रविवारी (दि. १९) होणाऱ्या ब्लॉकमुळे रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
मनमाड : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात धावणाऱ्या आठ गाड्या रविवारी (दि. १९) होणाऱ्या ब्लॉकमुळे रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
रेल्वे प्रशासनाकडून मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने ठाणे-दिवा ५ व्या आणि ६ व्या लाईन कार्यान्वित करण्यासाठी विशेष अधिक पॉवर ब्लॉक चालवण्याची योजना आखली आहे. दिवा (उत्तर) येथे क्रॉस ओव्हर डाऊन थ्रू डाऊन आणि अप लोकल मार्गावरून सुरू करण्याचे नियोजन आहे. ठाणे दिवा विभागादरम्यान मेन लाईनवरील या कामामुळे काही गाड्या रद्द करण्यात येत आहेत. या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. मध्य रेल्वेने रविवारी धावणाऱ्या मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेस, मुंबई- जालना एक्सप्रेस, जालना - मुंबई एक्सप्रेस, मुंबई मनमाड पंचवटी एक्सप्रेस, मुंबई-अमरावती एक्सप्रेस रद्द केल्या आहेत, तर शनिवारी धावणारी अमरावती-मुंबई एक्सप्रेस, नांदेड मुंबई राज्यराणी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. याशिवाय रविवारी धावणारी मुंबई नांदेड राज्यराणी एक्सप्रेसही रद्द करण्यात आली आहे.