एकलव्याची शिक्षणपद्धती निर्माण व्हावी : राम ताकवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 02:01 AM2018-03-27T02:01:01+5:302018-03-27T02:01:01+5:30
नव्या शैक्षणिक धोरणात अनेक शैक्षणिक संस्थांना स्वायत्तता, तर काहींनी अतिस्वायत्तता बहाल करण्यात आल्यामुळे औपचारिक विद्यापीठेही मुक्त शिक्षण देणार असल्याने मुक्त विद्यापीठाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे. मुक्त आणि पारंपरिक विद्यापीठांमधील संभाव्य स्पर्धा लक्षात घेता मुक्त विद्यापीठांना वेगळा मार्ग शोधावा लागणार असून, स्वयंअध्ययनाची एकलव्य शिक्षणपद्धती मुक्त विद्यापीठांना शोधावी लागेल, असे प्रतिपादन प्राध्यापक डॉ. राम ताकवले यांनी केले.
नाशिक : नव्या शैक्षणिक धोरणात अनेक शैक्षणिक संस्थांना स्वायत्तता, तर काहींनी अतिस्वायत्तता बहाल करण्यात आल्यामुळे औपचारिक विद्यापीठेही मुक्त शिक्षण देणार असल्याने मुक्त विद्यापीठाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे. मुक्त आणि पारंपरिक विद्यापीठांमधील संभाव्य स्पर्धा लक्षात घेता मुक्त विद्यापीठांना वेगळा मार्ग शोधावा लागणार असून, स्वयंअध्ययनाची एकलव्य शिक्षणपद्धती मुक्त विद्यापीठांना शोधावी लागेल, असे प्रतिपादन प्राध्यापक डॉ. राम ताकवले यांनी केले. यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाच्या वतीने मुक्त विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू प्रा. डॉ. राम ताकवले यांना डी.लिट. पदवीने सन्मानित करण्यात आले. कुलगुरू ई. वायुनंदन यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या लायब्ररी इमारतीच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. मुरलीधर चांदेकर उपस्थित होते. व्यासपीठावर कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, परीक्षा नियंत्रक डॉ. अर्जुन घाटुळे उपस्थित होते. यावेळी डॉ. ताकवले म्हणाले, युग बदलल्यानंतर अनेक परिमाणे बदलतात, समाजात आमूलाग्र बदल घडतो. जुने अंतर्धान पावते, नवा समाज निर्माण होतो. औद्योगित तंत्रज्ञानानंतर समाज डिजिटल युगाकडे आला आहे. तंत्रज्ञानानातील संशोधनाने अनेक कामे सोपी झाली. माणसांचे काम यंत्रे करू लागली आहेत. ही अपरिहार्यता असल्याने माणसांना जगविणारी आणि स्वयंसक्षम आणि शिक्षित होणारी अभ्यासप्रणाली विकसित करावी लागणार आहे, असे ताकवले म्हणाले. डिजिटल युगात मुक्त शिक्षण टिकविण्यासाठी दैनंदिन व्यवहारावर म्हणजेच सर्वसामान्यांशी निगडीत शिक्षण विकसित करावे लागेल. लोकाभिमुख म्हणजेच लोकांकडे जाणारी शिक्षणपद्धती अशी निर्माण झाली पाहिजे की लोकशिक्षण वाढत राहील. यामध्ये तुम्हाला समोर ठेवून लोकांनी शिक्षणाच्या प्रवाहात आले पाहिजे. स्वयंअध्ययनातून विद्यार्थी एकल व्याप्रमाणे उच्च पातळीवर गेला पाहिजे. भावी काळाचे शिक्षण म्हणून मुक्त विद्यापीठाने शिक्षणक्रम विकसित केले पाहिजे, असे प्रा. ताकवले म्हणाले. याप्रसंगी प्रा. ताकवले यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन प्रफुल्ल चिकेरूर यांनी केले. यावेळी ताकवले यांच्या जीवनकार्यावरील चित्रफित दाखविण्यात आली. शिक्षणक्षेत्रातील बदललांचा स्वीकार करताना मुक्त विद्यापीठांनी देखील बदलण्याची वेळ आलेली आहे.
बदलत्या शैक्षणिक प्रवाहात शिक्षणसंस्थांना मोठी स्वायत्ताता दिल्याने तेही मुक्त शिक्षणाकडे वळले आहेत. त्यामुळे मुक्त विद्यापीठांचे होणार काय असा प्रश्न पडतो. पारंपरिक विद्यापीठ आणि मुक्त विद्यापीठे यांच्यात होणारी स्पर्धा ही अविभाज्य असल्याचे स्वीकारून मुक्त विद्यापीठांनीदेखील प्रासंगिक शिक्षणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. हे बदलण्यास नक्कीच कालावधी लागेल, परंतु ही अपरिहार्यता आहे. - डॉ़ राम ताकवले, प्राध्यापक