सगळे 'ज्युनिअर' बोलले, पण नरेंद्र मोदींच्या सभेत एकनाथ खडसे भाषणापासून वंचित!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 02:34 PM2019-09-19T14:34:31+5:302019-09-19T14:35:24+5:30
केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्याचे अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, माजी केंद्रीय मंत्री डॉ सुभाष भामरे, दिंडोरीच्या खासदार डॉ भारती पवार यांची भाषणे झाली.
नाशिक - राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकण्यासाठी नाशकात होत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजय संकल्प सभेत व्यासपीठावर पहिल्या रांगेत उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना भाषणासाठी संधी न मिळाल्याने त्यांची उपेक्षा चर्चित ठरून गेली आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे पक्षात राहून पक्ष नेत्यांना वेळोवेळी खडे बोल सूनावण्यासाठी ओळखले जातात. मंत्री पदावरून दूर व्हावे लागल्यानंतर ते अधिकच कटू बोलताना दिसून आले आहेत, त्यामुळे नाशकात मोदी यांच्या विजय संकल्प सभेत ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. पण तशी संधीच त्यांना मिळाली नाही.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्याचे अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, माजी केंद्रीय मंत्री डॉ सुभाष भामरे, दिंडोरीच्या खासदार डॉ भारती पवार यांची भाषणे होत असताना खडसे यांचा नंबर कधी येईल याची उपस्थितांना उत्सुकता लागून होती. पण मोदी व मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे व्यासपीठावर आगमन झाल्यावर खडसे यांना भाषणाची संधी मिळण्याची शक्यता दुरावली. सातारचे उदयनराजे भोसले यांनी मोदी यांना पगडी घातली, तर लगेच पालकमंत्री गिरीश महाजन यांचे प्रास्ताविक झाले. त्यांनी हिंदीत सुरुवात करून मोदींचे स्वागत केले. उत्तर महाराष्ट्रातुन खासदारकीच्या आठच्या आठ म्हणजे शंभर टक्के जागा दिल्या, आता विधानसभेत 47 पैकी 47 जागा निवडून देऊ, फार तर एखादी जागा इकडे तिकडे होईल असा विश्वास महाजन यांनी यावेळी व्यक्त केला. त्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचेही भाषण झाले. महाजनादेश यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यात कोणत्या शहराला पहिला नंबर द्यायचा असा प्रश्न पडल्याचे ते म्हणाले. मंत्रिमंडळात मते अनेक पण निर्णय एक, अश्या पद्धतीने काम चालल्याचे पाटील म्हणाले. महाराष्ट्रात जनादेश घेण्यासोबतच आशीर्वाद घेण्यासाठी यात्रा निघाल्याचे सांगत आता 220 येणार की 250 जागा येणार इतकाच प्रश्न उरला आहे, त्यासाठी संकल्प करायचंय असेही पाटील म्हणाले
दरम्यान खडसे यांचे जळगाव जिल्ह्यातील व पक्षातीलही प्रतिस्पर्धी म्हणवणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा या सभेतील बोलबाला मात्र लक्षवेधी होता.