एकनाथ खडसे यांची ‘लाचलुचपत’कडून चौकशी पाऊण तास हजेरी : चौकशीबाबत गूढ कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 01:20 AM2018-04-11T01:20:24+5:302018-04-11T01:20:24+5:30
नाशिक : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पुण्यातील भोसरी येथील जमीन प्रकरणासह अपसंपदेबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या आरोपांची नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चौकशी करीत आहे़
नाशिक : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पुण्यातील भोसरी येथील जमीन प्रकरणासह अपसंपदेबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या आरोपांची नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चौकशी करीत आहे़ याबाबत खडसे यांनी मंगळवारी (दि़ १०) दुपारी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कार्यालयात हजेरी लावली. सुमारे पाऊण तास खडसे यांची चौकशी करण्यात आली असली तरी, लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवल्याने यासंदर्भातील गूढ वाढले आहे. गतवर्षी २० सप्टेंबर २०१७ रोजी खडसे यांची अशीच सुमारे अडीच तास चौकशी करण्यात आली होती़ माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी भोसरी येथील एमआयडीसीच्या जमीन खरेदी प्रकरणाबाबत प्रारंभी अनभिज्ञता दाखवून या व्यवहाराचे पैसे आपण दिले नसल्याचा पवित्रा घेतला होता़ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रसिद्धीमाध्यमांसमोर खडसेंच्या बँक व्यवहाराची माहिती जाहीर करून न्यायालयात तक्रारही केली होती़ न्यायालयाने खडसेंविरुद्ध चौकशी करणाºया लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर ताशेरे ओढले होते़ नाशिक लाचलुचपत विभागाकडून खडसेंच्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून, निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्राद्वारे सादर केलेली मालमत्ता, आयकर विभागागील माहिती यांची तपासणी सुरू आहे़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काही दिवसांपूर्वी आरोपांच्या चौकशीसाठी खडसेंकडून कागदपत्रांची मागणी केली होती़ खडसे यांनी दिलेल्या कागदपत्रांमध्ये काही अडचणी असल्याने त्यांना खुलासावजा चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते़ या कागदपत्रांचा नव्याने अभ्यास केल्यानंतर खडसेंना चौकशीसाठी पुन्हा बोलाविण्यात येणार असल्याचे वृत्त आहे़ मंगळवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास खडसे लाचलुचपत विभागात चौकशीसाठी आल्यानंतर साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांची चौकशी पूर्ण झाली़ याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागास माहिती विचारली असता त्यांनी सोयीस्करपणे मौन बाळगले़
चौकशी कोणाची याचीच चर्चा
माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे़ त्यानुसार खडसे यांची मंगळवारी (दि़१०) सुमारे पाऊण तास चौकशी करण्यात आली़ मात्र, चौकशी नेमकी कशाबाबत केली याबाबत माहिती देण्यास एसीबीच्या अधिकाºयांनी नकार दिला़ सहा महिन्यांपूर्वी खडसेंची चौकशी करण्यात आली त्यावेळीही उगले यांनी ‘नो कॉमेंट’ म्हणत माहिती दिली नव्हती़ त्यामुळे लाचलुचपत विभाग खडसेंची चौकशी करतो की खडसेच लाचलुचपत विभागाचा कारभार सुरळीत सुरू आहे की नाही याची चौकशी करतात, अशी चर्चा आहे़