बैठकीवरून राजकारण, एकनाथ शिंदे यांनी बोलावली बैठक; पण मंत्रीच निमंत्रित नाही
By संजय पाठक | Updated: February 14, 2025 14:41 IST2025-02-14T14:40:46+5:302025-02-14T14:41:14+5:30
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंद यांच्याकडे नगरविकास खाते असले तरी गेल्या महिन्यात मुंबईत झालेल्या बैठकीस ते उपस्थित नव्हते.

बैठकीवरून राजकारण, एकनाथ शिंदे यांनी बोलावली बैठक; पण मंत्रीच निमंत्रित नाही
संजय पाठक, नाशिक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या महिन्यात मुंबईला कुंभमेळा नियोजन बैठक घेतली होती. त्यावेळी गैरहजर असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नाशिकमध्ये सर्व संबधीत शासकीय यंत्रणांची बैठक बेालावली आहे. विशेष म्हणजे या बैठकीला कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हेच उपस्थित नसल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंद यांच्याकडे नगरविकास खाते असले तरी गेल्या महिन्यात मुंबईत झालेल्या बैठकीस ते उपस्थित नव्हते. मात्र, आज नाशिकला आभार दौऱ्यासाठी येणार असल्याने एकनाथ शिंदे यांनी दुपारी चार वाजता कुंभमेळ्याच्या तयारीसाठी बैठक बोलावली आहे. यात नाशिक महापालिका, जिल्हा परीषद, नाशिक महानगर विकास प्राधीकरण अशा विविध यंत्रणांना पाचारण करण्यात आले आहे. मात्र, त्यामुळेच राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. मुंबईला बैठकीसाठी हजर न राहणाऱ्या शिंदे यांनी नाशिकला वेगळी स्वतंत्र बैठक बोलवली आहे.
शिवाय कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना देखील निमंत्रीत केलेले नाही. त्यामुळे महायुतीतच आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यासंदर्भात भाजपाचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी मात्र, गिरीश महाजन हे विदर्भात संघटनेच्या बैठकीसाठी उपस्थित असल्याने ते नाशिकच्या बैठकीस येऊ शकले नाहीत. त्यांचे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे यासंदर्भात बोलणेही झाले होते, असे सांगितले.