वृद्ध दांपत्य गंभीर जखमी अवस्थेत
By admin | Published: November 27, 2015 11:46 PM2015-11-27T23:46:50+5:302015-11-27T23:47:21+5:30
गूढ वाढले : मऱ्हळ शिवारात निर्जन वस्तीवरील घटना
सिन्नर : तालुक्यातील मऱ्हळ खुर्द शिवारात मऱ्हळ-पांगरी रस्त्यावरील निर्जन वस्तीवर राहत्या घरात वृद्ध दांपत्य गंभीर जखमी अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. सुरुवातीला सदर घटना दरोडा असल्याची अफवा पसरली होती. मात्र पोलिसांना घरातून कोणत्याही वस्तूची चोरी झाली नसल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी सदर प्रकार दरोड्याचा नसावा असा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र गंभीर अवस्थेत वृद्ध दांपत्य आढळून आल्याने या घटनेचे गूढ वाढले आहे.
मऱ्हळ-पांगरी रस्त्यावर सुमारे अर्धा किलोमीटर अंतर आतमध्ये कुटे वस्ती आहे. याठिकाणी नामदेव दगडू कुटे (७०) व सत्यभामा नामदेव कुटे (६५) हे वृद्ध दांपत्य वास्तव्यास आहे. शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास त्यांचा एक नातेवाईक केबल आणण्यासाठी त्यांच्या वस्तीवर गेल्यानंतर हे वृद्ध दांपत्य रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्याने नातेवाईक व ग्रामस्थांना फोनवरून घटनेची माहिती दिल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली.
त्यानंतर घटनेची माहिती वावी पोलिसांना देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक रामेश्वरी पांढरे, हवालदार रामदास धुमाळ, हनुमंत कांबळे, अतुल फलके, शिवाजी माळी, एस. व्ही. शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी वृद्ध दांपत्याचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने ते बेशुद्ध पडले होते. त्यांना तातडीने संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
सदर घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच पांगरी व मऱ्हळ शिवारातील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. सदर प्रकार दरोड्याचा असल्याची अफवा पसरली होती. मात्र सदर वृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने, कंबरेची पैशांची पिशवी व घरातील वस्तू जागेवर असल्याने सदर प्रकार दरोड्याचा नसावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. मात्र या वृद्ध दांपत्यास कोणी व का मारहाण केली असावी याबाबत तर्कवितर्क काढले जात होते. हे दांपत्य शुद्धीवर आल्यानंतरच खरा प्रकार समोर येईल. त्यामुळे घटनेचे गूढ वाढले आहे. (वार्ताहर)