रहिवाशांमध्ये दहशत : दोनवाडे गावात बिबट्याच्या हल्ल्यात वृध्द ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 05:44 PM2020-06-15T17:44:34+5:302020-06-15T17:47:07+5:30
देवळाली कॅम्प : नाशिक तालुक्यातील भगूर जवळील दोनवाडे येथील रहिवाशी जीवराम गोविंद ठुबे (७६) यांच्यावर बिबट्याने झापामध्ये शिरून पहाटेच्यासुमारास ...
देवळाली कॅम्प : नाशिक तालुक्यातील भगूर जवळील दोनवाडे येथील रहिवाशी जीवराम गोविंद ठुबे (७६) यांच्यावर बिबट्याने झापामध्ये शिरून पहाटेच्यासुमारास साखरझोपेतच हल्ला चढविल्याची घटना सोमवारी (दि.१५) उघडकीस आली. सव्वा महिन्यापुर्वी घराच्या ओट्यावर खेळत असलेल्या एका चिमुकल्याला बिबट्याच्या हल्ल्यात याच गावात प्राण गमवावे लागले होते. या दुर्घटनेने गावात शोककळा पसरली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, दोनवाडे गावात जीवराम ठुबे हे आपल्या शेतीतील घरात एकटेच राहत होते. रविवारी मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास झोपडीवजा घरात बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवून ठार मारले आणि त्यांच्या मृतदेहाचा काही मांसल भाग खाऊन प्रेत लगतच्या नाल्याजवळ सोडून दिल्याचे सकाळी उघडकीस आले. जीवराम हे मळ्यातील घराच्या पडवीत झोपत असत मात्र उकाडा जाणवत असल्याचे ते पडवीचा दरवाजा उघडा ठेवत होते. सोमवारी सकाळी ८ वाजता ठुबे यांचा नातू सागर हा आजोबाना चहा घेऊन पडवीत आला असता घराच्या उंबरठ्यावर रक्ताचे डाग दिसून आले .आजोबा घरात नसल्याचे बघून सागरन दोनवाडे गावातील घरी येऊन वडील दत्तू ठुबे यांना माहीती दिली. दत्तु ठुबे व परिसरातील काही नागरिकांनी मळ्यात धाव घेतली. घरात सांडलेले रक्त बघून त्यांनी नाल्याकडे धाव घेतली. तेथे जीवराम यांचा मृतदेह त्यांना आढळून आला.
पोलीस पाटील संपत वाघ यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाणे व वनविभागाला तात्काळ घटनेची माहिती दिली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास वांजळे ,वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.मयत जीवराम ठुबे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, चार मुले असा परिवार आहे.
--
तीन पिंजरे तैनात; ट्रॅप कॅमेरे बसविणार
दोनवाडे गावच्या मळे परिसरात बिबट-मानव संघर्ष उभा राहिला आहे. या भागात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या पथकाने तत्काळ शेताच्या बांधांलगत तीन पिंजरे अभ्यासपुर्ण पध्दतीने तैनात केले आहे. दोनवाडे मळे परिसरात वनविभाग व इको-एको फाउण्डेशनचे वन्यजीवप्रेमींकडून सर्व पाहणी करून ट्रॅप कॅमेरे बसविले जाणार आहे. याद्वारे बिबट्याच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे. तसेच बिबट हल्ल्यातील काही नमुनेदेखील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी सांगितले.