नाशकात मॉर्निंग वॉक करताना वृद्धा ठार; भरधाव कारने दोघांना उडविले
By अझहर शेख | Published: November 7, 2023 06:45 PM2023-11-07T18:45:34+5:302023-11-07T18:46:01+5:30
गणेश भाऊराव डोंगरे (३९) असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असल्याचे अंबड पोलिसांनी सांगितले.
नाशिक : शहर व परिसरात रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूच्या घटना सुरूच आहेत. वडाळा-पाथर्डी रस्त्यावर मॉर्निंग वॉक करणाऱ्या एका वृद्धेला भरधाव दुचाकीने धडक दिली. या धडकेत गंभीररीत्या जखमी झालेल्या ताराबाई रतनलाल परदेशी (७०, रा. बालाजी दीप अपार्टमेंट, इंदिरानगर) यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत लेखानगरच्या स्टेट बँक चौकासमोर भरधाव जाणाऱ्या मारुती स्विफ्ट डिझायर कारने दुचाकीस्वारांना उडविले. यावेळी कारचालक विरुद्ध दिशेने बेदरकारपणे वाहन चालवीत आल्याने समोरासमोर झालेल्या या धडकेत दुचाकीस्वार दोघे युवक बाजूला फेकले गेले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीररीत्या जखमी झाला आहे. गणेश भाऊराव डोंगरे (३९) असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असल्याचे अंबड पोलिसांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी, मंगळवारी (दि.७) पहाटे गणेश डोंगरे हे त्यांचे मित्र ज्ञानेश्वर कटारेसोबत दुचाकीने (एमएच- १५, डीई- ६३०४) लेखानगरकडून पाथर्डी फाट्याकडे जात होते. मुंबई-आग्रा महामार्गाच्या समांतर रस्त्यावरून प्रवास करताना स्टेट बँकेच्या चौकात विरुद्ध बाजूने भरधाव आलेल्या कारच्या (एमएच- १५, एफएफ- ०७६९) चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत वाहनाच्या वेगावर नियंत्रण न ठेवता डोंगरे यांच्या दुचाकीला धडक दिली. ही दुर्घटना मंगळवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. अपघात इतका भीषण होता की, मोटार रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुभाजकावर चढून गवतामध्ये जाऊन थांबली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. कटारे यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी कारचालकाविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारचालकाचा अंबड पोलिस शोध घेत आहेत.नाशिक शहर व परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. रस्ते अपघातात पादचाऱ्यांचा होणारा मृत्यू चिंतेचा विषय बनला आहे. शहरात बेदरकारपणे वाहने चालविणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे.
भगूर रस्त्यावर दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. भगूर रस्त्यावर दुचाकीचालकाचा तोल जाऊन कोसळल्याने मृत्यू झाला. नाणेगाव-भगूर रस्त्यावर घडली. येथून दुचाकीने शनिवारी (दि.४) सुदाम आसाराम उदावंत (५०, रा. नाणेगाव) हे दुपारी तीन वाजेच्या सुमारास प्रवास करत होते. यावेळी रामबागसमोर त्यांचा तोल जाऊन ते खाली कोसळले. यामुळे त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्यांना जवळच्या धामणगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथून पुढील उपचारासाठी पुतण्या अक्षय उदावंत याने शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.