मुंबई येथून आलेल्या वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 08:54 PM2020-05-21T20:54:05+5:302020-05-21T23:23:43+5:30
देवळा : तालुक्यातील वासोळपाडा येथील माहेरवाशीण असलेल्या व मुंबईहून आल्यानंतर मृत झालेल्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी दिली.
देवळा : तालुक्यातील वासोळपाडा येथील माहेरवाशीण असलेल्या व मुंबईहून आल्यानंतर मृत झालेल्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी दिली.
सदर महिला दि. १६ रोजी मुंबई येथून टेंभे (ता. सटाणा ) येथे आली होती. दुसऱ्या दिवशी (दि. १७) रोजी या महिलेला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे वासोळपाडा येथे असलेल्या आपल्या मुलाला फोन केला. मुलगा टेंभे येथे गाडी घेऊन आला. आपल्या आईला घेऊन तो मेशी (ता. देवळा) येथील एका खासगी दवाखान्यात तपासणीसाठी घेऊन आला.
यावेळी महिलेची गंभीर परिस्थिती बघून डॉक्टरांनी तिला नाशिक येथे जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. तिला नाशिक येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच दि. १८ रोजी तिचा मृत्यू झाला. या महिलेचा स्वॅबचा नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल गुरुवारी (दि. २१) प्राप्त झाला असून, ही महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती डॉ. मांडगे यांनी दिली.
देवळा तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, दक्षता म्हणून वासोळपाडा येथील या महिलेच्या भावाचे कुटुंबीय व मेशी येथील डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्य तसेच या महिलेच्या संपर्कात आलेले अशा एकूण नऊ व्यक्तींना देवळा येथील कोरोना केअर सेंटरमध्ये कॉरण्टाइन करण्यात आले आहे. मेशी व वासोळपाडा येथे आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मेशी गावातील ग्रामस्थांनी रविवारी (दि. २४) संपूर्ण गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून, बाहेरून येणाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे.