पेठ तालुक्यात ३६ ग्रामपंचायतींची निवडणूक
By admin | Published: March 13, 2016 10:44 PM2016-03-13T22:44:12+5:302016-03-13T23:06:27+5:30
१७ एप्रिल रोजी ११२ प्रभागांत होणार मतदान
पेठ : मे-आॅगस्टमध्ये मुदत संपणाऱ्या पेठ तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा रणसंग्राम गाजणार असून, तालुक्यातील राजकीयदृष्टीने महत्त्वाच्या ठरलेल्या गावांचा यात समावेश आहे. ११२ प्रभागांतून या निवडणुका होणार आहेत. त्याची अधिसूचना येत्या १८ मार्च रोजी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये प्रसिद्ध होणार असल्याची माहिती तहसीलदार कैलास कडलग यांनी दिली.
शुक्रवार दि १८ मार्च रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द होणार असुन मंगळवार २९ मार्च पासुन ते शनिवार २ एप्रिल पर्यंत स. ११ ते दु. ३ वाजेपर्यंत उमेदवारांना नामनिर्देशपत्र दाखल करता येतील, सोमवार ४ एप्रिल रोजी प्राप्त नामनिर्देशपत्राची छाननी स. ११ वाजेपासून सुरु होणार आहे, तर बुधवार दि ६ एप्रिल रोजी स. ११ ते दु. ३ वाजेपर्यंत नामनिर्देशपत्र (अर्ज) माघारीची मुदत असून, दुपारी 3 वाजेनंतर उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येईल.
रविवार दि. १७ एप्रिल २०१६ रोजी स. ७.३० ते सायं. ५.३०
पर्यंत मतदान घेण्यात येईल, सोमवार दि. १८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने वेळ व ठिकाण निश्चित करून मतमोजणी होणार आहे, तर गुरुवार दि. २१ एप्रिल २०१६ रोजी अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार कैलास कडलग व निवासी नायब तहसीलदार एच. एन. झिरवाळ यांनी दिली. (वार्ताहर)