आयमा निवडणूक
By admin | Published: May 19, 2014 12:38 AM2014-05-19T00:38:09+5:302014-05-19T01:05:50+5:30
अध्यक्षपदी पाटील यांच्यासह सहा बिनविरोध
अध्यक्षपदी पाटील यांच्यासह सहा बिनविरोध
१९ जागांसाठी २३ अर्ज दाखल
सातपूर : अंबड इंडस्ट्रिज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा)च्या द्वैवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कार्यालयीन पदाधिकार्यांच्या सहा जागांसाठी सहा अर्ज दाखल झाल्याने अध्यक्षपदी विवेक पाटील यांच्यासह सहाही पदाधिकार्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. उर्वरित कार्यकारिणी सदस्यांच्या १९ जागांसाठी २३ अर्ज दाखल झाले आहेत.
आयमाच्या द्वैवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यात अध्यक्ष पदासाठी विवेक पाटील, उपाध्यक्ष पदासाठी वरुण तलवार, सरचिटणीस पदासाठी विद्यमान सरचिटणीस राजेंद्र अहिरे, खजिनदार पदासाठी निखिल पांचाळ, सहसचिव पदासाठी उन्मेश कुलकर्णी व व्यंकटेश मूर्ती आदि उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. कार्यालयीन पदाधिकार्यांच्या सहा जागांसाठी केवळ सहाच उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने या सर्व पदाधिकार्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
कार्यकारिणी सदस्यांच्या १९ जागांसाठी २३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यात विद्यमान सदस्यांचाही समावेश आहे. उमेदवारी अर्ज माघारीचा अंतिम दिवस गुरुवार असल्याने चार दिवसांत याबाबत बैठक घेण्यात येणार असून, विचारविनिमय करण्यात येईल. त्यानंतर कार्यकारिणी सदस्यांच्या १९ जागादेखील बिनविरोध होणार असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
सत्ताधार्यांच्या विरोधात पॅनलची निर्मिती होऊन निवडणूक रंगण्याची चिन्हे दिसत असतानाच विरोधकांची मनधरणी करण्यात आयमाच्या माजी अध्यक्षांचे मंडळ यशस्वी ठरले आहे. त्यामुळे यावेळची निवडणूक बिनविरोध होणार आहे. यात आयमाचे माजी अध्यक्ष विजय तलवार, ज्ञानेश्वर गोपाळे, संदीप सोनार, विद्यमान अध्यक्ष सुरेश माळी, धनंजय बेळे यांसह जवळपास सर्व माजी अध्यक्षांनी पुढाकार घेऊन आयमाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चंद्रशेखर काम पाहत आहेत.
संपूर्ण निवडणूकप्रक्रिया बिनविरोध झाली असली, तरी निवडणूक कार्यक्रमानुसार आयमाची वार्षिक सर्वसाधारण सभा ३० मे रोजी होणार असून, त्यावेळी निवडणूक अधिकृत घोषित करण्यात येणार आहे. (वार्ताहर)