जिल्हा नियोजन समितीची निवडणूक जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 01:24 AM2017-08-22T01:24:34+5:302017-08-22T01:24:34+5:30
जिल्हा नियोजन समितीची निवडणूक जाहीर करण्यात आली असून, त्यासाठी सोमवारपर्यंत (दि. २८) नामांकन दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. १७ सप्टेंबर रोजी त्यासाठी मतदान घेण्यात येणार आहे.
नाशिक : जिल्हा नियोजन समितीची निवडणूक जाहीर करण्यात आली असून, त्यासाठी सोमवारपर्यंत (दि. २८) नामांकन दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. १७ सप्टेंबर रोजी त्यासाठी मतदान घेण्यात येणार आहे. सोमवारी अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रामदास खेडकर यांनी या निवडणुकीची अधिसूचना जारी केली. त्यानुसार नामांकन दाखल करण्याची अंतिम मुदत २८ आॅगस्ट असून, दि. २५ व २६ रोजी शासकीय सुटी असल्यामुळे अर्ज दाखल करता येणार नाही. अन्य दिवशी मात्र सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. ३० आॅगस्ट रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येणार असून, दुसºया दिवशी यादी प्रसिद्ध करण्यात येईल. नामनिर्देशन पत्राबाबत काही अपील असल्यास ४ सप्टेंबरपर्यंत जिल्हाधिकाºयांकडे अपील दाखल करता येणार आहे. त्याची सुनावणी ६ सप्टेंबरपर्यंत करणे बंधनकारक असून, माघार घेण्याची मुदत ८ सप्टेंबरपर्यंत आहे. १७ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ ते चार वाजेपर्यंत मतदान होणार असून, दुसºया दिवशी मतमोजणी करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिका, नगरपंचायतीचे सदस्य व नाशिक, मालेगाव महापालिकेचे नगरसेवक मतदान करतील. या सदस्यांमध्ये अनुसूचित जाती, ओबीसी व सर्वसाधारण असे तीन गटांसाठी आरक्षण ठेवण्यात आले आहे.