मंत्र्यांच्या पाठीमागे लागणार निवडणूक कॅमेरे
By admin | Published: January 18, 2017 12:52 AM2017-01-18T00:52:09+5:302017-01-18T00:52:33+5:30
आचारसंहितेच्या तक्रारी : मुनगंट्टीवार प्रकरण मुंबईकडे
नाशिक : वित्तमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांनी शिक्षकांना विम्याचे कवच शक्य असल्याचे केलेली घोषणा व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आचारसंहितेनंतर शिक्षक भरती करण्याचे दिलेले आश्वासन व त्यामुळे दाखल होत असलेल्या आचारसंहिता भंगाच्या तक्रारी पाहता आता सरकारमधील मंत्री व महामंडळाच्या अध्यक्ष, सदस्यांच्या पाठीमागे आता निवडणूक कॅमेरे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्णात सध्या पदवीधर निवडणूक तसेच महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता जारी असून, आचारसंहितेचे काटेकोर पालन केले जावे यासाठी शासकीय पातळीवर पूरेपूर प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी राजकीय पक्षांचे फलक, निवडणूक चिन्हे, आमदार व खासदारांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामांचे फलक झाकण्यात आले आहेत. राजकीय पक्षांचे ध्वजही काढून टाकण्यात आलेले आहेत. अशा परिस्थितीत राजकीय पुढारी, मंत्र्यांनाही मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या घोषणांवर बंदी घालण्यात आलेली आहे. असे असताना वित्तमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांनी शिक्षकांना विम्याचे कवच देणे शक्य असल्याची घोेषणा मुंबई येथे केल्यावर त्या संदर्भात जिल्हा निवडणूक शाखेकडे आचारसंहिता भंगाची तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीतच सध्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आचारसंहिता सुरू असून, या मतदारसंघात मतदार म्हणून शिक्षकांची संख्या अधिक असल्याने त्यांच्यावर प्रभाव टाकण्यासाठीच मुनगंट्टीवार यांनी घोषणा केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आल्याने जिल्हा आचारसंहिता कक्षाने या तक्रारीची खातरजमा केली असता, मुंबईच्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्हा प्रशासनाने सदरची तक्रार अधिक चौकशीसाठी बृहन्मुंबई जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविली आहे. निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याबाबत भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप यांच्या विरोधातही दाखल झालेल्या तक्रारीची प्रशासनाने नाशिकचे प्रांत व तहसीलदारांमार्फत तसेच महापालिका आयुक्तांकडून माहिती मागविली असता, ज्या कामांचे आमदार सानप यांनी लोकार्पण केले ते काम कोणत्याही शासकीय अनुदानातून वा विकास निधीतून केले नसल्याचे स्पष्ट झाल्याने ही तक्रार निकाली काढण्यात आली आहे.
सोमवारी नाशिक भेटीवर आलेले शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी संस्था चालकांच्या बैठकीत निवडणूक आचारसंहितेनंतर शिक्षकांची भरती करण्याचे आश्वासन दिल्याने त्याची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली असून, निवडणूक आचारसंहिता सुरू असल्याने प्रशासनाने राजशिष्टाचार केलेला नसला तरी, त्यांच्या दौऱ्यात संस्थाचालकांच्या बैठकीचा कोणताही उल्लेख नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर तावडे यांनी संस्थाचालकांना आश्वासन दिले असल्यास त्याबाबत माहिती जात आहे. निवडणूक आचारसंहितेच्या काळात उमेदवारांच्या प्रचारासाठी राजकीय पक्षांचे नेते, मंत्री शहरात दाखल होतील हे पाहता, यापुढे प्रचारासाठी येणाऱ्या नेते, मंत्र्यांच्या दौऱ्यात निवडणूक आयोगाचा कॅमेरा ठेवण्यात येणार आहे. बुधवारी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे नाशिक दौऱ्यावर येत असून, त्यांच्या या दौऱ्यावरही आता लक्ष ठेवण्यात येणार आहे.