निवडणूक दक्षता : जिल्ह्यात एक हजार सशस्त्र पोलीस दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 08:36 PM2019-10-17T20:36:56+5:302019-10-17T20:56:39+5:30

जिल्ह्यात एकूण ३ हजार ४२३ मतदान केंद्रे असून त्यापैकी ३२ मतदान केंद्रे संवेदनशील असून, या संवेदनशील केंद्रांवर सशस्त्र पोलीस तैनात राहणार आहे

Election efficiency: One thousand armed police are registered in the district | निवडणूक दक्षता : जिल्ह्यात एक हजार सशस्त्र पोलीस दाखल

निवडणूक दक्षता : जिल्ह्यात एक हजार सशस्त्र पोलीस दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देसर्व स्ट्रॉँगरूम हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेत ११ मतदारसंघांतून निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार ३२ संवेदनशील मतदान केंद्रांत संचलन जिल्ह्यात एकूण ३ हजार ४२३ मतदान केंद्रे

नाशिक : विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया येत्या सोमवारी (दि.२१) पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा ग्रामीण पोलीस यंत्रणेकडून चोख पोलीस बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. सीआयएसएफ, आरपीएफ, जीआरपीएफच्या तब्बल ११ तुकड्यांचे जिल्ह्यात १ हजाराहूंन अधिक सशस्त्र पोलीस दाखल झाले आहेत. यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल, रेल्वे पोलीस दल, गुजरात राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांचा समावेश आहे.
जिल्ह्यात एकूण ३ हजार ४२३ मतदान केंद्रे असून त्यापैकी ३२ मतदान केंद्रे संवेदनशील असून, या संवेदनशील केंद्रांवर सशस्त्र पोलीस तैनात राहणार आहे. तसेच जिल्ह्यात १० स्ट्रॉँगरूम असून, स्ट्रॉँगरूममध्ये ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रांच्या सीलबंद पेट्या ठेवल्या जाणार असल्याने सर्व स्ट्रॉँगरूमच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ५ कंपन्यांकडे सोपविली जाणार आहे. या दलाचे सुमारे पाचशेहून अधिक जवान स्ट्रॉँगरूमवर सशस्त्र खडा पहारा देणार असल्याचे सिंह यांनी सांगितले. तसेच सर्व स्ट्रॉँगरूम हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेत आहे.
शहराच्या तुलनेत जिल्ह्यात मतदान केंद्रांची संख्या मोठी असून, ११ मतदारसंघांतून निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उतरले आहेत. त्यामुळे प्रत्येक तालुकास्तरावर मतदानप्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी ग्रामीण पोलिसांची कसोटी लागणार आहे. त्यानुसार सिंह यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्ताचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला गेला आहे. यानुसार पोलीस प्रशासन जिल्ह्यात सर्वच तालुकास्तरावर चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. मालेगाव, निफाड यांसारख्या संवेदनशील असलेल्या तालुक्यांमधील मतदान केंद्रांवर ‘ड्रोन’द्वारे पोलीस नजर ठेवणार आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर जरब निर्माण करण्यासाठी ग्रामीण पोलीस प्रशासनाने दाखल झालेल्या विविध तुकड्यांच्या जवानांसमवेत ३२ संवेदनशील मतदान केंद्रांत संचलन केले.

असा आहे पोलीस बंदोबस्त
१ पोलीस अधीक्षक, २ अपर पोलीस अधीक्षक, १२ उपअधीक्षक, ४३ पोलीस निरीक्षक, ११८ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, २ हजार ८७४ कर्मचारी, २ हजार ५२६ होमगार्ड, गुजरातचे ८०० होमगार्ड, ५ सीआरपीएफच्या कंपन्या, ३ जीएसआरपीएफच्या कंपन्या, ३ सशस्त्र रेल्वे पोलीस दलाच्या कंपन्या अशा एकूण ११ कंपन्यांचे सुमारे अकराशे सशस्त्र जवान असा मोठा फौजफाटा जिल्ह्यात तैनात राहणार आहे.

निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सर्वोपरी प्रयत्नशील आहे. सर्वसामान्यांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये, जिल्ह्यात कायदासुव्यवस्था टिकवून रहावी, यासाठी चोख पोलीस बंदोबस्ताची आखणी केली गेली आहे. कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही.
- डॉ. आरती सिंह, पोलीस अधीक्षक, नाशिक

Web Title: Election efficiency: One thousand armed police are registered in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.