नाशकात पोटनिवडणुकीत सेना-भाजपाची प्रतिष्ठा पणाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 03:49 PM2018-03-16T15:49:39+5:302018-03-16T15:49:39+5:30
प्रभाग क्रमांक १३ : मनसेची मदार भोसले कुटुंबीयांवर, दोन्ही कॉँग्रेस द्विधावस्थेत
नाशिक - देश आणि राज्याच्या स्तरावर शिवसेना-भाजपात कमालीचा आलेला दुरावा पाहता, त्याचे पडसाद महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणुकीतही उमटण्याची चिन्हे दिसून येत आहेत. पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सेना-भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागली असून उभयतांकडून ताकदवार उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत. प्रभागात पक्ष म्हणून मनसेचा प्रभाव नसल्याने पक्षाची मदार भोसले कुटुंबीयावरच असणार आहे तर कॉँग्रेस-राष्टवादीतही अंतर्गत बंडाळीच्या शक्यतेने द्विधावस्था निर्माण झालेली आहे.
प्रभाग क्रमांक १३ (क) मधील मनसेच्या नगरसेवक सुरेखा भोसले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी येत्या ६ एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी येत्या २० मार्चपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत आहे. आतापर्यंत केवळ एकच उमेदवाराचा अर्ज दाखल झालेला आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग १३ मध्ये मनसेच्या सुरेखा भोसले यांच्यासह कॉँग्रेसचे शाहू खैरे व वत्सला खैरे आणि राष्टवादीचे गजानन शेलार निवडून आले होते. त्यावेळी, याच प्रभागात मनसे, कॉँग्रेस आणि राष्टवादी अशी अघोषित युती बघायला मिळाली होती. आता, पोटनिवडणुकीत सदर जागेसाठी मनसेकडून भोसले कुटुंबीयातील अॅड. वैशाली मनोज भोसले यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे आले आहे. सद्यस्थितीत मनसेचा राज्यभर ओसरलेला प्रभाव आणि नाशिकमध्येही झालेली वाताहत पाहता पोटनिवडणुकीत पक्ष म्हणून फारसा प्रभाव राहिल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे, पक्षाची मदार ही सर्व भोसले कुटुंबीयावरच आहे. पोटनिवडणुकीसाठी राज ठाकरे प्रचार सभेला येतील की नाही, याबाबत शंका आहे. त्यात, गर्दी जमविणारे स्थानिक असे नेतृत्व उरले नसल्याने पक्षाच्या चिंता वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत, मनसेच्या हातातून सदर जागा खेचून घेण्यासाठी शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. भाजपाला महापालिकेतील गेल्या वर्षाच्या सत्ताकाळातील नागरिकांचा कौल अजमावण्याची या निमित्ताने संधी चालून आली आहे तर शिवसेनेने भाजपाच्या वर्षभराच्या कारभाराचा हिशेब मांडत समीकरणे बदलण्याची व्यूहरचना आखली आहे. त्यामुळे, दोन्ही पक्षांकडून ताकदवार उमेदवाराला पसंती दिली जाणार आहे.