एका उमेदवारामुळे पाच जागांसाठी निवडणूक
By admin | Published: September 26, 2015 11:17 PM2015-09-26T23:17:56+5:302015-09-26T23:18:33+5:30
जिल्हा कृषी औद्योगिक संघ : ‘त्या’ची माघार नाहीच
नाशिक : अतिशय शेवटच्या क्षणापर्यंत निवडणूक होण्याची चिन्हे असलेल्या जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली, असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात ३८ (३) या संवर्गासाठी निवडणूक होणे अटळ ठरले आहे.
२५ सप्टेंबरपर्यंत जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघाच्या निवडणुकीसाठी माघार घेण्याची अंतिम मुदत होती. या शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजेची माघारीची वेळ असताना प्रत्यक्षात माघारी नाट्य मात्र सायंकाळ उशिरापर्यंत चालल्याचे चित्र होते. अगदी शेवटच्या क्षणी सर्व जागांसाठी निवडणूक बिनविरोध झाली, असे सांगत इच्छुकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला खरा, मात्र १५ संचालक असलेल्या जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघाच्या ३८(३) या महत्त्वाच्या संवर्गात पाच जागा असताना प्रत्यक्षात सहा उमेदवारांचे अर्ज असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या पाच जागांसाठी का होईना, निवडणूक होणार आहे. मात्र बिनविरोध निवडून आलेल्या काही संचालकांनी ही निवडणूक बिनविरोधच होणार, असा दावा केला आहे. मात्र माघारीच्या अंतिम दिवसापर्यंत अपेक्षित जागांपेक्षा जास्त अर्ज शिल्लक राहिल्यास त्या जागेसाठी निवडणूक घेणे, हे निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेत नमूद असते. त्यानुसारच आता जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघाच्या ३८(३) या संवर्गासाठी निवडणूक होणार आहे. या संवर्गासाठी पाच जागा असताना प्रत्यक्षात सहा उमेदवारांचे अर्ज शिल्लक असल्याचे कळते. त्यात प्रकाश कवडे, सोमनाथ मोरे, तुकाराम पेखळे, दिलीप मोरे, बाळासाहेब गायकवाड आणि संदीप पानगव्हाणे या सहा उमेदवारांचे अर्ज शिल्लक असल्याचे समजते. या संवर्गात अवघे ५१ मतदार असल्याने मतदारांना सहा पैकी पाच उमेदवारांना निवडून द्यावे लागणार आहे. संघाच्या १०० ते २००० भाग भांडवल असलेल्या मतदारांसाठी ३८ (१) तसेच २०० ते ५००० भाग भांडवल असलेल्या मतदारांसाठी ३८(२), तर पाच हजारांच्या पुढे भाग भांडवल असलेल्या ३८(३) असा गट (संवर्ग)आहे. ३८(१) व ३८(२) या संवर्गात संचालक पदाइतकेच अर्ज आल्याने या दोन्ही संवर्गासाठी निवडणूक बिनविरोध झाल्यासारखी आहे. (प्रतिनिधी)