महापालिका निवडणूक : कॉँग्रेस-राष्ट्रवादी ‘आघाडी’चे संकेत
By admin | Published: October 5, 2016 01:15 AM2016-10-05T01:15:57+5:302016-10-05T01:16:29+5:30
विरोधाच्या तलवारी म्यान
नाशिक : राज्यातील आणि देशातील सत्ता गेल्यानंतर या अपयशाचे खापर एक-दुसऱ्यावर फोडणाऱ्या कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीने सुरुवातीला स्वबळावर निवडणुका लढविण्याचा नारा दिला खरा; परंतु आता मात्र एकमेकांशिवाय निवडणुका लढविणे सोपे नाही, हे उभय पक्षांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून आघाडीचे संकेत मिळाले आहेत.दोन दिवसांपूर्वीच नाशिकला आलेले कॉँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी कॉँग्रेस कार्यकर्ते नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी अनेकांनी महापालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादीशी आघाडी करण्याची मागणी केली. राष्ट्रवादी कॉँग्रेसनेही मध्यंतरी अशीच बैठक घेतली तेव्हा कॉँग्रेसशी युती करण्याची इच्छा प्रदर्शित करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचीही आघाडीची तयारी असल्याचे नूतन शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी सांगितले.
कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीत पटत नाही. निवडणुका जवळ येताच स्वबळाच्या भाषा सुरू होतात. यंदाही तसेच घडले. कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दोन महिन्यांपूर्वीच बैठका घेतल्या तेव्हा राष्ट्रवादीविषयी तक्रारी करण्यात आल्या. काहींनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली होती.
त्या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी मनपा निवडणुकीत राष्ट्रवादीला बरोबर घ्यायचे किंवा नाही याचा स्थानिक स्तरावरच निर्णय घ्यावा, असे स्पष्ट करताना श्रेष्ठींकडून आघाडी लादली जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते.