नाईक शिक्षण संस्थेची निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 01:32 AM2019-06-19T01:32:00+5:302019-06-19T01:33:14+5:30
क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीची निवडणूक मंडळाचे अध्यक्ष अॅड. गजेंद्र सानप यांनी मंगळवारी (दि.१८) घोषणा केली. संस्थेच्या अध्यक्षपदासह ४ पदाधिकारी, ६ विश्वस्त व १९ तालुका संचालक अशा एकूण २९ जागांसाठी येत्या २० जुलै रोजी संस्थेचे ८ हजार ७०० सभासद या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
नाशिक : जिल्ह्यातील मराठा विद्या प्रसारक संस्थेनंतर दुसऱ्या क्रमांकाचा विस्तार असलेल्या क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीची निवडणूक मंडळाचे अध्यक्ष अॅड. गजेंद्र सानप यांनी मंगळवारी (दि.१८) घोषणा केली. संस्थेच्या अध्यक्षपदासह ४ पदाधिकारी, ६ विश्वस्त व १९ तालुका संचालक अशा एकूण २९ जागांसाठी येत्या २० जुलै रोजी संस्थेचे ८ हजार ७०० सभासद या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या मुख्यालयात मंगळवारी (दि.१८) निवडणूक मंडळाचे अध्यक्ष अॅड. गजेंद्र सानप यांनी पत्रकार परिषद घेत संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी निवडणूक मंडळातील सदस्य अॅड. अशोक कातकाडे व अॅड. संतोष दरगोडे उपस्थित होते.
यावेळी अॅड. सानप म्हणाले, की संस्थेच्या २०१९ ते २०२४ या पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी ही निवडणूक प्रक्रिया आहे. महत्त्वाच्या पदांमध्ये सहा विश्वस्त व संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस व सहचिटणीस या चार जागांचा समावेश आहे. कार्यकारी मंडळात एकूण १९ सदस्य असून, त्यात इगतपुरी ४, सिन्नर ३, निफाड व चांदवड ३, येवला व मालेगाव २, नांदगाव, बागलाण, कळवणला २, दिंडोरी, पेठ व सुरगाणा तालुक्यात ३ जागा व महिलांसाठी दोन जागा राखीव असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीसाठी लवाद म्हणून अॅड. एस. जी. सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
असा आहे कार्यक्रम
२४ जून रोजी प्राथमिक मतदान यादी जाहीर होणार.
च्२४ ते २७ जूनपर्यंत मतदार यादीवर हरकती नोंदविता येतील.
च्२९ जून रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द होईल.
च्३० जून ते ३ जुलै दरम्यान उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृती.
च्४ जुलै रोजी अर्जांची छाननी. त्यानंतर पात्र उमेदवारांची यादी जाहीर होणार.
च्५ ते ८ जुलैपर्यंत माघार घेता येईल.
च्९ जुलैला उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करून चिन्ह वाटप होणार.
च्२० जुलै रोजी संस्थेच्या मुख्यालयात मतदान होईल.
च्२१ जुलै रोजी मतमोजणी
राजकीय हालचालींना वेग
संस्थेची निवडणूक जाहीर होताच विरोधकांसह सत्ताधारी गटामध्येही निवडणुकांच्या हालचालींना वेग आला आहे. सत्ताधारी पॅनलचे नेते कोंडाजी आव्हाड, सरचिटणीस हेमंत धात्रक यांच्या नेतृत्वाखाली पॅनल तयार होणे निश्चित मानले जात असून, सत्ताधाऱ्यांना आव्हान देण्यासाठी विरोधकांनी परिवर्तन पॅनलची घोषणाही केली आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली पंढरीनाथ थोरे, अॅड. पी. आर. गिते आदींनी या पॅनलच्या माध्यमातून सत्ताधाºयांविरोधात लढत देण्याची तयारी सुरू केली आहे.