निफाड, चांदवड तालुक्यातील निवडणूकही स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:15 AM2021-02-10T04:15:37+5:302021-02-10T04:15:37+5:30
नाशिक: सरपंच पदाचे आरक्षण काढतांना नियम आणि निकषांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरेाप करीत न्यायालयात याचिका दाखल झाल्याने जिल्ह्यातील तीन ...
नाशिक: सरपंच पदाचे आरक्षण काढतांना नियम आणि निकषांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरेाप करीत न्यायालयात याचिका दाखल झाल्याने जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील २१८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची निवडणूक येत्या १६ तारखेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. उर्वरित सरपंच पदाची निवडणूक निर्धारित कार्यक्रमानुसारच होणार आहे. दरम्यान आरक्षणाबाबतच्या हरकती वाढल्याने राबविण्यात आलेली प्रक्रिया चर्चेत आली आहे.
जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसाार येत्या १२ आणि १५ तारखेला सरपंच पदाची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. मात्र सिन्नर तालुक्यातील दहिवडी येथील सरपंच आरक्षणाला हरकत घेण्यात आल्यामुळे सिन्नर तालुक्यातील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. आता निफाड आणि चांदवड तालुक्यातील सरपंच पदाची निवडणूकही अशाच कारणामुळे स्थगित करण्यात आलेली आहे. या तीनही तालुक्यांमधील एकूण २१८ ग्रामपंचायतींची निवडणूक आता येत्या १६ तारखेनंतर घेतली जाण्याची शक्यता आहे. निफाड तालुक्यातील ६५, सिन्नर तालुक्यातील १०० तर चांदवड तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींना आता स्थगिती मिळाली आहे.
देवळा तालुक्यातील उमराणे व येवला तालुक्यातील कातराणे या दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुका निवडणूक आयोगाने रद्द केल्या. त्यामुळे ६२१ पैकी ६१९ ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच पदाच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. दाखल झालेल्या याचिकांनुसार उच्च न्यायालयाने जिल्ह्यातील निफाड, सिन्नर व चांदवड या तीन तालुक्यातील २१८ ग्रामपंचायतींच्या सरपंच,उपसरपंच निवडीला स्थगिती दिली आहे. चांदवड तालुक्यातील मौजे वागदर्डी, सिन्नर तालुक्यातील रामपूर व दहीवडी महाजनपूर गावचे आरक्षण तर निफाड तालुक्यातील करंजगाव ग्रामपंचायतीच्या आरक्षणाबाबत रिट याचिका दाखल झाल्याने या तीनही तालुक्यांमधील निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे.
दरम्यान, चांदवड आणि निफाड येथील तहसीलदारांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.