समर्थ, जनलक्ष्मी, इंदिरा महिला बँकेची निवडणूक जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2022 01:22 AM2022-07-09T01:22:57+5:302022-07-09T01:23:17+5:30
जिल्ह्यात सहकारी बँकांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार असून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी आणखी सात सहकारी बँकांसह काही पतसंस्था, पतपेढी व क्रेडिट सोसायट्यांचा निवडणूक कार्यक्रम घाेषित केला आहे.
नाशिक : जिल्ह्यात सहकारी बँकांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार असून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी आणखी सात सहकारी बँकांसह काही पतसंस्था, पतपेढी व क्रेडिट सोसायट्यांचा निवडणूक कार्यक्रम घाेषित केला आहे. जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील ओझर येथील सरस्वती सहकारी बँक, निफाड येथील लोकनेते आर. डी. आप्पा शिरसागर (मुक्ताई) सहकारी बँक, निफाड अर्बन को-ऑप बँक, नाशिकमधील श्री समर्थ सहकारी बँक यांच्या संचालक मंडळासाठी १४ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान घेतले जाणार असून, त्यासाठी शुक्रवार, दि. ८ जुलैपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या बँकांच्या निवडणुकीची मतमोजणी १६ ऑगस्टला होणार आहे. शेड्यूल बँक असलेल्या जनलक्ष्मी को-ऑप बँकेसाठी १६ ऑगस्ट रोजी मतदान घेतले जाणार असून दि. १७ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. या बँकेसाठीही ८ जुलैपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याचबरोबर महाराष्ट्र राज्य वीज वर्कर्स फेडरेशन सभासदांची सहकारी पतसंस्था (मतदान दि. १४ ऑगस्ट), नाशिक जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था (मतदान दि. १४ ऑगस्ट), नाशिक जिल्हा ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्था (मतदान दि. १६ ऑगस्ट), नाशिक जिल्हा आदिवासी विकास विभाग सहकारी कर्मचारी सहकारी पतपेढी (मतदान दि. १४ ऑगस्ट), मायको एम्प्लाईज को-ऑप क्रेडिट सोसायटी (मतदान दि. १४ ऑगस्ट) व एचएएल एम्प्लाइज को-ऑप क्रेडिट सोसायटी (मतदान दि. १३ ऑगस्ट) यांचाही निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.