नाशिक महापालिकेच्या सभापतीपदासाठी आज निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:11 AM2021-07-19T04:11:48+5:302021-07-19T04:11:48+5:30
नाशिक : महापालिकेच्या यंदाच्या पंचवार्षिक कारकिर्दीतील अखेरच्या प्रभाग सभापतीपदाच्या निवडणुका सोमवारी (दि.१९) होणार असून यात पूर्व विभाग वगळता पाच ...
नाशिक : महापालिकेच्या यंदाच्या पंचवार्षिक कारकिर्दीतील अखेरच्या प्रभाग सभापतीपदाच्या निवडणुका सोमवारी (दि.१९) होणार असून यात पूर्व विभाग वगळता पाच प्रभागात सत्तारूढ भाजप आणि विरोधकांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याने राजकीय वर्तुळाचे त्याकडे लक्ष लागून आहे.
सोमवारी (दि. १९) विभागीय आयुक्तांनी प्राधिकृत केलेले निवडणूक निर्णय अधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली या निवडणुका होणार आहेत.
सहा प्रभाग समित्यांच्या सभापती पदासाठी १३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
नाशिक पूर्व विभागात भाजपच्या डॉ. दिपाली कुलकर्णी यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांच्या निवडीची औपचारिकता बाकी आहे. सिडको प्रभाग समिती सभापतीपदासाठी शिवसेनेच्या सुवर्णा मटाले यांची निवड निश्चित मानली जात असली तरी त्यांना भाजपच्या छाया देवांग यांनी आव्हान दिले आहे.
पंचवटी आणि नाशिकरोडमध्ये सभापतीपदासाठी भाजपत रस्सीखेच आहे. पंचवटीत भाजपकडून मच्छीन्द्र सानप, पूनम सोनवणे आणि रुची कुंभारकर या तिघांनी अर्ज दाखल केला आहे. माजी आमदार सानप यांच्या पुत्रानेही अर्ज दाखल केल्याने चुरस वाढली असली तरी आजी माजी आमदारांचा कस लागणार आहे.
नाशिकरोड मध्ये भाजपकडून मीरा हाडंगे आणि सुमन सातभाई यांनी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेकडून प्रशांत दिवे यांनी अर्ज दाखल केला आहे. या प्रभाग समितीत भाजप आणि शिवसेनेसह विरोधकांकडे समसमान संख्याबळ असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. कदाचित चिठ्ठी टाकून फैसला होण्याची शक्यता आहे.
पश्चिम प्रभागात भाजपने प्रथमच अर्ज दाखल करून महाविकास आघाडीसमोर आव्हान उभे केले आहे. भाजपकडून योगेश हिरे तर काँग्रेसकडून वत्सला खैरे यांनी अर्ज दाखल केले आहेत.
सातपूर विभागात मनसेलाच पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे. या विभागात
भाजप आणि मनसेची पुन्हा युती असून भाजपने मनसेला पाठिंबा दिल्याने मनसेच्या योगेश शेवरे यांची निवड अटळ असल्याचे दिसत आहे. त्यांना शिवसेनेचे मधुकर जाधव यांनी आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.