सभापतिपदासाठी १४ रोजी निवडणूक
By Admin | Published: March 7, 2017 11:30 PM2017-03-07T23:30:48+5:302017-03-07T23:31:07+5:30
येवला : नाशिक जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापतिपदाच्या निवडणुका मंगळवारी (दि. १४) होत आहेत.
येवला : नाशिक जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापतिपदाच्या निवडणुका मंगळवारी (दि. १४) होत आहेत. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी यासंबंधीचे आदेश पारित केले आहेत. संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली त्या-त्या पंचायत समित्यांच्या सभागृहात सभापती निवडीसाठी विशेष सभा घेण्यात येणार आहे.
येवला तालुका पंचायत समिती सभापती आणि उपसभापतिपदाच्या निवडणूक प्रक्रियेसाठी येवल्याचे तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात विशेष सभा बोलावण्यात आली आहे. मंगळवारी (दि. १४) सकाळी ११ ते १ पर्यंत सभापती आणि उपसभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. दुपारी १ वाजता नामनिर्देशन पत्रांची छाननी केली जाणार आहे. येवला पंचायत समितीत शिवसेनेचे सात आणि राष्ट्रवादीचे तीन सदस्य निवडून आले आहेत. शिवसेनेचा सभापती आणि उपसभापती होणार असल्याचे स्पष्ट आहे. सभापतिपद इतर मागासवर्ग महिला राखीव असल्याने सेनेच्या अंदरसूल गणातील नम्रता जगताप आणि सावरगाव गणातून निवडून आलेल्या आशाबाई साळवे यांच्यापैकी कोणाची वर्णी लागणार याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे. अडीच वर्षांत दोघांनाही सव्वा सव्वा वर्षाचे सत्तेचे वाटे करायचे हादेखील पर्याय खुला आहे. राष्ट्रवादीला पंचायत समितीत मविप्र संचालक अंबादास बनकर यांनी एकहाती किमान तीन जागा मिळवत तारले. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या राजकारणात सेना-भाजपाची युती तुटली, राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसची आघाडी बिघडली. सेनेने सत्तास्थाने ताब्यात घेतल्यामुळे राष्ट्रवादीच्या अंतर्गत कलहाला सणसणीत चपराक बसली आहे. सेनेने सत्ता काबीज केली पण आता मात्र विकासाचे आव्हान पेलावे लागणार आहे. (वार्ताहर)