सटाणा पालिकेच्या विषय समित्यांची निवडणूक रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:16 AM2021-03-10T04:16:18+5:302021-03-10T04:16:18+5:30

सटाणा नगर परिषदेच्या विषय समितींच्या सभापतीपदासाठी निवडणूक होणार होती. त्याचा कार्यक्रम पीठासीन अधिकारी जितेंद्र इंगळे, मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी ...

Election of subject committees of Satana Municipality canceled | सटाणा पालिकेच्या विषय समित्यांची निवडणूक रद्द

सटाणा पालिकेच्या विषय समित्यांची निवडणूक रद्द

Next

सटाणा नगर परिषदेच्या विषय समितींच्या सभापतीपदासाठी निवडणूक होणार होती. त्याचा कार्यक्रम पीठासीन अधिकारी जितेंद्र इंगळे, मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी जाहीर केला. या बैठकीला नगराध्यक्ष सुनील मोरे, नगरसेवक मनोहर देवरे, बाळू बागुल, नगरसेविका सुरेखा बच्छाव, पुष्पाताई सूर्यवंशी, शमिम मुल्ला आदी उपस्थित होते. गेल्या ४ वर्षांपासून विषय समितींच्या निवडणुका बिनविरोध होत होत्या. मंगळवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी सटाणा शहर विकास आघाडीला दोन सभापती, भाजपला दोन तर राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाला दोन सभापतीपद देण्यावर शिक्कामोर्तब झाले होते. नियोजन व विकास समिती पदसिद्ध असल्याने ती समिती उपनगराध्यक्षांकडेच असते. तर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाला बांधकाम व आरोग्य समिती, भाजपला पाणीपुरवठा, नियोजन विकास समिती तर शहर विकास आघाडीकडे क्रीडा, शिक्षण व वाचनालय समिती देण्यासंदर्भात निर्णय नगरसेवकांमध्ये झाले होते.

परंतु ऐनवेळी पाणीपुरवठा सभापतीपदासाठी नितीन सोनवणे, निर्मला भदाणे, रूपाली सोनवणे यांनी दावा सांगितला. त्यातच आपल्यालाही समिती मिळावी अन्यथा निवडणुकीला सामोरे जाऊ, असा इशारा संगीता देवरे यांच्याकडून देण्यात आल्याचे समजते. सुरेखा बच्छाव, सुवर्णा नंदाळे व मुन्ना शेख यांनीही समिती मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केल्याने पहिल्यांदाच सभापतीपदासाठी नगरसेवकांमध्ये एकमत झाले नाही. पाणीपुरवठा सभापतीपद मिळविण्यासाठी हट्ट धरून बसलेल्या नगरसेवकांची समजूत काढण्यात प्रत्येक पक्षाच्या गटनेत्यांना अपयश आले. दुपारी तीन वाजेपर्यंत पालिका सभागृहात सभापतीपदासाठी एकाही नगरसेवकाचा अर्ज दाखल न झाल्याने पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार जितेंद्र इंगळे यांनी त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला आहे.

इन्फो

भाजप नगरसेवकांत चुरस

गेल्या ४ वर्षांत वेगवेगळ्या पक्षाकडून निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये समिती निवडणुकीवेळी एकमत असायचे. मंगळवारी नगरसेवकांमध्ये मात्र त्याबाबत का एकमत झाले नाही यावर तर्कवितर्क लढविले जात आहेत. येत्या काही दिवसांत पुनद पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन होऊ घातले आहे. भाजप सरकारने या योजनेला निधी मंजूर केला म्हणून पाणीपुरवठा सभापतीपदावर भाजपने हक्क सांगितला. त्या पदावर भाजपच्याच तीन नगरससेवकांनी हट्ट धरल्याने त्यांच्यात एकमत न झाल्याची चर्चा आहे.

Web Title: Election of subject committees of Satana Municipality canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.