नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

By दिनेश पाठक | Published: May 17, 2024 10:08 PM2024-05-17T22:08:20+5:302024-05-17T22:08:49+5:30

- दुर्गम भागात सॅटेलाईटची सुविधा; १७ हजार निवडणूक कर्मचारी

Election system ready for Nashik, Dindori Lok Sabha constituencies | नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

नाशिक (दिनेश पाठक) : सोमवारी (दि.२०) होत असलेल्या जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक विभाग सज्ज झाला असून मतदानासाठी जास्तीचा प्रवास नसावा, मतदारांची पायपीट थांबावी यासाठी प्रत्येक दोन किलोमीटरच्या आत किमान एक मतदान केंद्र असेल. आदिवासी बहुल असलेल्या दुर्गम भागात सॅटेलाईटची सुविधा कार्यान्वित करण्यात येणार असून संपर्कासाठी वॉकिटॉकीची सुविधा असेल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा मुख्य निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

निवडणुकीसाठी झालेल्या तयारीची माहिती शर्मा यांनी दिली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधी, निवडणूक उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरूळे, माहिती अधिकारी सप्रंता बिडकर उपस्थित होते. प्रत्येक मतदान केंद्रावर गरज पडल्यास रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यासोबतच जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय पथकास सज्ज राहण्याची सूचना देण्यात आल्याची माहिती जलज शर्मा यांनी दिली. नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघ मिळून ४४ भरारी पथके, ८२ स्थायी पथके, २४ चलचित्र सर्वेक्षण पथके, १२ चलचित्र निरीक्षण पथके, १६ आंतरजिल्हा, आंतरराज्य तपासणी नाक्यासह सज्ज आहेत. भरारी व स्थायी पथकांमध्ये केंद्रीय पोलिस दलाचे सदस्य समाविष्ट केले आहेत.

- मतदान कर्मचारी : एकूण ११० टक्के प्रमाणात १७ हजार २८ कर्मचारी केंद्रावर नियुक्त केले जाणार आहेत. ज्यामध्ये एकूण ५०८२ महिला कर्मचारी आहेत.
- वाहतूक व्यवस्था : मतदान कर्मचारी व मतदान यंत्रे याकरिता ५३० बसेस यासह १२५२ वाहनांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
- वेबकास्टिंग : नाशिक लोकसभा मतदारसंघात ९५५ केंद्रावर तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात ९६१ केंद्रांवर बेवकास्टिंगची पूर्वतयारी पूर्ण झालेली आहे.
- सूक्ष्म निरीक्षक : दिंडोरी लोकसभा मतदारसंघाकरिता १३०, तर नाशिक लोकसभा मतदारसंघाकरिता २४० सूक्ष्म निरीक्षक () यांची नेमणूक करण्यात आली आहे. नियुक्त करण्यात आलेले निरीक्षक त्यांचा अहवाल मुख्य निवडणूक निरीक्षक यांच्याकडे सादर करतील.
- दिव्यांग मतदार : नाशिक जिल्ह्यात २,३१७ ठिकाणी व्हीलचेअरची सोय करण्यात येईल. ६२२ मतदारांना वाहतूक सुविधा पुरविण्याची पूर्वतयारी करण्यात आलेली आहे.

Web Title: Election system ready for Nashik, Dindori Lok Sabha constituencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.