महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाची आज निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 01:06 AM2019-07-18T01:06:55+5:302019-07-18T01:07:13+5:30
महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी भाजपाने अखेरीस सहा इच्छुकांपैकी उद्धव निमसे यांना उमेदवारी दिली असून, गेल्या अनेक दिवसांपासून प्रबळ दावेदार मिळणाऱ्या गणेश गिते यांचा पत्ता कट केला आहे.
नाशिक : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी भाजपाने अखेरीस सहा इच्छुकांपैकी उद्धव निमसे यांना उमेदवारी दिली असून, गेल्या अनेक दिवसांपासून प्रबळ दावेदार मिळणाऱ्या गणेश गिते यांचा पत्ता कट केला आहे. बुधवारी (दि.१७) निमसे यांनी महापौरांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. निमसे यांना अन्य विरोधी पक्षांनी आव्हान दिले नसले तरी सत्तारूढ भाजपाच्या मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेच आव्हान देण्याचा प्रयत्न केला असून, या पक्षाच्या कल्पना पांडे यांनी अर्ज दाखल केला आहे.
महापालिकेची तिजोरी मानल्या जाणाºया स्थायी समितीला महापालिकेच्या अर्थकारणात विशेष महत्त्व आहे. विशेषत: यंदाच्या निवडणुकीवर आगामी विधानसभा निवडणुकीच्या राजकारणाचेदेखील सावट आहे. महापालिकेच्या स्थायी समिती आणि अन्य विषय समित्यांच्या सभापतिपदाच्या निवडणुका गुरुवारी (दि. १८) होणार आहेत. सर्वाधिक महत्त्वाच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी भाजपात सर्वप्रथम गणेश गिते यांची दावेदारी बळकट मानली जात होती. पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांचे नाव जोरात असले तरी अन्य इच्छुकांनी त्यांच्या स्तरावर तयारी केली होती. नुकत्याच पार पडलेल्या विषय समित्यांच्या सदस्यपदाच्या निवडणुकीत भाजपाचे २० सदस्य नियुक्त झाले असून, त्यात १२ जण केवळ पूर्व विधानसभा मतदारसंघातील असल्याचे निमित्त करून गिते यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आला होता. भाजपाकडून गिते यांच्या व्यतिरिक्त उद्धव निमसे, कमलेश बोडके तसेच मध्य विधानसभा मतदारसंघातून स्वाती भामरे आणि पश्चिम विभागातून भाग्यश्री ढोमसे, पुष्पा आव्हाड यांनी इच्छा व्यक्त केली होती. दोन दिवसांपासून अनेकांनी मुंबई, नाशिक अशा वाºया केल्या होत्या. तसेच संघटनमंत्री किशोर काळकर यांच्याकडे विशिष्ट व्यक्तींनाच झुकते माप दिल्याच्यादेखील तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे भाजपाच्या वतीने उमेदवारी दाखल करण्याच्या दिवशी एकच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार बुधवारी (दि.१७) सकाळी साडेअकरा वाजता पक्षाने गणेश गिते, उद्धव निमसे आणि स्वाती भामरे या तिघांना अर्ज भरून ठेवण्यास सांगितले आणि त्यानंतर दुपारी एक वाजता उमेदवारी दाखल करण्यास दहा मिनिटे बाकी असताना निमसे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृह नेता सतीश सोनवणे, गटनेता जगदीश पाटील, शिवाजी गांगुर्डे, गणेश गिते यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, भाजपाच्या उमेदवारीचा घोळ सुरू असतानाच शिवसेनेच्या वतीने कल्पना पांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
भाजपातील विधानसभेची तयारी तसेच आमदारांमधील रस्सीखेच यातून उद्धव निमसे यांचे नाव अखेरीस निश्चित झाले. निमसे यांनी कॉँग्रेसकडून नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर स्थायी समिती सभापतिपद भूषविले आहे. विशेष म्हणजे स्थायी समितीत एक वर्ष पूर्ण झालेल्या सदस्यांना बाहेर काढून त्यांच्या जागी नवीन नगरसेवकांना संधी देण्याच्या भाजपाच्या मोहिमेत निमसे यांचेही नाव होते. त्यांचा समितीवरील एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला असताना त्यांना ही संधी दिल्याने अन्य तीन नगरसेवकांनादेखील राजीनामा न देता समितीवरच राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
भाजपाचा दोन तासांचा सस्पेन्स
स्थायी समिती सभापतिपदासाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल होईल, असे सांगितले जात असताना प्रत्यक्षात मात्र तीन अर्ज ‘भरण्यास’ म्हणजे केवळ अर्ज लिहून ठेवण्यास सांगण्यात आले.
४साडेअकरा वाजता संघटन मंत्री किशोर काळकर यांनी गणेश गिते, उद्धव निमसे आणि स्वाती भामरे यांनीच अर्ज तयार ठेवावे, असे सांगितले, त्यानुसार तयारी करण्यात आली.
४भाजपाची सर्व सूत्रे मुंबईहून फिरत होती. दोन तासांच्या सस्पेन्सनंतर उमेदवारी दाखल करण्याची वेळ टळत आल्यानंतर १२.५० वाजता उद्धव निमसे यांचे नाव घोषित करण्यात आले.