कोरोनाचा धोका घेऊन वावरत आहे निवडणूक कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:13 AM2021-01-18T04:13:10+5:302021-01-18T04:13:10+5:30
नाशिक : निवडणूक प्रक्रियेसाठी १०,१४९ इतक्या मोठ्या संख्येने निवडणूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. मतदानासाठी कर्मचारी जाताना त्यांची ...
नाशिक : निवडणूक प्रक्रियेसाठी १०,१४९ इतक्या मोठ्या संख्येने निवडणूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. मतदानासाठी कर्मचारी जाताना त्यांची कोरोना चाचणी करण्यात यावी याबाबतचे स्पष्ट आदेश नसल्याचे सांगत जिल्ह्यात एकाही कर्मचाऱ्याची कोरोना टेस्ट करण्यात आली नसल्याचे प्रशासनानेच स्पष्ट केले आहे. त्यामुळे परत आल्यानंतरही त्यांची कोणतीही तपासणी करण्यात आलेली नाही. गर्दीच्या ठिकाणाहून आलेले हे कर्मचारी कोरोनाचा संभाव्य धोका घेऊन वावरत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्याताील ६६५ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीसाठी सुमारे १० हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले होते. निवडणूक मतदानाच्या निमित्ताने थेट जनतेशी संपर्क येणार असल्याने या कर्मचाऱ्यांची काेरोना चाचणी करणे अपेक्षित होते; परंतु राज्य निवडणूक आयोगाकडून तसेच आरोग्य विभागाकडून या बाबतच्या स्पष्ट सूचना नसल्याने मतदानाच्या मोहिमेवर जाताना एकाही कर्मचाऱ्याची तशी तपासणी करण्यात आलेली नव्हती. मतदान कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असल्याने सर्वांचीच चाचणी करणे शक्य नसल्याने ज्या कर्मचाऱ्यांना ताप, खोकला अन्य काही लक्षणे असतील तरच त्यांची चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता; परंतु असे कोणतेही कर्मचारी नसल्याने तसेच आरोग्याच्या मुद्यावर अनेकांना या प्रक्रियेपासून बाजूला ठेवण्यात आल्याचा युक्तिवाद अधिकाऱ्यांनी सांगितला.
मतदान ड्यूटीवरून परतल्यानंतर देखील कुणाचीही तपासणी करण्यात आलेली नाही. कोणत्याही कर्मचाऱ्याला क्वारंटाइन करण्यात आलेले नाही. त्यामुळे कोरोनाच्या संदर्भात जिल्ह्यातून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. ज्यांना त्रास होत असेल त्यांना मात्र दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.
--कोट--
मतदानाला जाताना थर्मल मशीनच्या साह्याने शरीराचे तापमान मोजण्यात आले; परंतु कोरोना चाचणी घेण्यात आलेली नव्हती. मतदानाची ड्यूटी करून आल्यानंतर देखील शासकीय पातळीवर तपासणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे कुटुंबातील सदस्यदेखील काळजीत आहेत.
- एक निवडणूक कर्मचारी
--इन्फो--
ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान केंद्रांवर सुरुवातीला मतदारांचे स्कॅनिंग करण्यात आले. मात्र, दुपारनंतर गर्दी वाढत गेल्याने स्कॅनिंग पूर्ण होऊ शकले नाही.
स्कॅनिंगची व्यवस्था करण्यात आलेली होती. सॅनिटाझर तसेच ऑक्सिमीटरदेखील मतदान केंद्रांवर होते. मतदाराला मास्क घालूनच मतदान केंद्रात सोडले जात होते. तरीही गर्दीमुळे काही ठिकाणी नियोजन कोलमडले.
--इन्फो--
मतदान कक्षात बसलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपल्या सुरक्षिततेची अधिक काळजी वाटत होती, असे एका अधिकाऱ्याने खासगीत सांगितले. आलेेल्या मतदारांच्या तोंडाला मास्क लावलेला होता; परंतु नाकावर मास्क अनेकांनी घेतलेला नव्हता. वयोवृद्ध मतदारांना तर सक्तीने सांगताही येत नव्हते. प्रशासनाने मतदारांच्या रांगा तसेच कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी नियोजन केले असले तरी नियोजन कोलमडले.