जिल्ह्यातील १०९९ सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 07:32 PM2020-06-24T19:32:15+5:302020-06-24T19:33:16+5:30
नाशिक : राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे जिल्ह्यातील तब्बल १०९९ सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली असून, त्यात जिल्ह्यातील नाशिक जिल्हा गिरणा, नाशिक जिल्हा महिला विकास, जनलक्ष्मी, गणेश या सहकारी बॅँकांचा समावेश आहे.

जिल्ह्यात सन २०२० मध्ये एकूण ११८२ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार होत्या. त्यात २१ नागरी सहकारी बॅँका,२३१ नागरी, ग्रामीण सहकारी पतसंस्था, ५०१ विविध कार्यकारी संस्था, १० खरेदी-विक्री संघ, १४८ पगारदार नोकरांच्या पतसंस्था आदी संस्थांचा समावेश आहे. राज्यभर कोरोनाचे संकट असल्यामुळे शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुकांना तीन महिने स्थगिती दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील ब, क आणि ड वर्गातील एकूण १०९९ सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती मिळाली आहे. यापूर्वी राज्य शासनाने मार्च महिन्यात सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली होती. त्या आदेशाची मुदत संपल्याने सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी नव्याने आदेश दिल्याने आता १८ सप्टेंबरपर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती मिळाली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे नागरी सहकारी बॅँकांच्या निवडणुकांसाठी तयारी केलेल्या अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला असून, त्यांना पुन्हा नव्याने तयारी करावी लागणार आहे.