ऐन निवडणुकीत भाजपतील द्वंंद्व चव्हाट्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 01:37 AM2019-03-30T01:37:15+5:302019-03-30T01:38:03+5:30
मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे आणि माजी आमदार वसंत गिते यांच्यातील मध्यंतरी शमलेला वाद गिते यांच्या चिरंजिवांमुळे पुन्हा पेटला आहे.
नाशिक : मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे आणि माजी आमदार वसंत गिते यांच्यातील मध्यंतरी शमलेला वाद गिते यांच्या चिरंजिवांमुळे पुन्हा पेटला आहे. शासनाचे महिला रुग्णालय भाभानगर येथील जागेतच करण्यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न करणाऱ्या आमदाराचे काम म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन असल्याची तक्रार उपमहापौर प्रथमेश गिते यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली. ती निकाली काढण्यात आली असली तरी यातून पुन्हा वाद वाढण्याची शक्यता आहे.
राज्य शासनाचे महिला रुग्णालय भाभानगर येथे करण्यास माजी आमदार वसंत गिते यांचा विरोध होता. मात्र तरीही फरांदे यांनी हे रुग्णालय याच जागी करण्यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न केला. आचारसंहितेच्या अगोदरच या कामाचे भूमिपूजन झाले असल्याने फरांदे यांनी गितेंवर मात केली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर रुग्णालयाचे काम सुरू झाले अशी तक्रार उपमहापौर प्रथमेश गिते यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती.
जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम खात्याचा अहवाल मागविला. त्यानुसार त्यांनी आदर्श आचारसंहितेच्या आधी म्हणजेच ५ मार्च रोजी कार्यारंभ आदेश दिला होता असे स्पष्ट केल्याने जिल्हा प्रशासनाने आचारसंहिता भंगाची तक्रार निकाली काढली आहे. अर्थात यामुळे उभयांतील राजकीय वाद वाढण्याची शक्यता अधिक आहे.
दोन वर्षे उपमहापौरपदावर असूनही प्रथमेश यांना पक्ष आणि शासकीय कामकाज समजू शकलेले नाही. ते वयाने लहान आहेत. बालबुद्धी असल्याने किमान वडिलांचा सल्ला घेऊन कामकाज केले असते तर बरे झाले असते. या कामकाजात कोणतीही अनियमितता नाही. परंतु केवळ महिलांच्या रुग्णालय होऊ द्यायचे नाही म्हणून विरोध केला जात आहे.
- देवयानी फरांदे, आमदार
उपमहापौर प्रथमेशच नाही तर त्यांच्या वडिलांचा म्हणजेच माझाही विरोध आहे. कारण आम्ही परिसरातील नागरिकांबरोबर असून, त्यांच्या बरोबरीनेच ही तक्रार केली होती. प्रकरण न्याय प्रविष्ट असताना तसेच मध्य नाशिकमध्ये अनेक जागा असतानादेखील नागरिकांचा विरोध मोडून याच ठिकाणी महिला रुग्णालयाचा आग्रह कशासाठी? हा प्रश्न आहे.
- वसंत गिते, माजी आमदार