इगतपुरी तालुक्यात मतदान सुरळीत सुरू ; 4 ठिकाणी बिघडलेले मतदान यंत्र बदलले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 09:16 AM2019-04-29T09:16:45+5:302019-04-29T09:16:51+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी इगतपुरी तालुक्यातील 156 मतदान केंद्रांवर सकाळीपासून मतदारांची मतदान करण्यासाठी रांग लागली.
घोटी (नाशिक) : लोकसभा निवडणुकीसाठी इगतपुरी तालुक्यातील 156 मतदान केंद्रांवर सकाळीपासून मतदारांची मतदान करण्यासाठी रांग लागली. 4 ठिकाणी मतदान यंत्रात तांत्रिक अडचण आल्याने यंत्र बदलून मतदान सुरळीत करण्यात आले आहे. इगतपुरी, घोटी, वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यांनी चोख नियोजन करून मतदान केंद्रांवर बंदोबस्त ठेवलेला आहे. उन्हाच्या कडाक्यामुळे लवकर मतदान करण्याकडे मतदारांचा कल दिसून आला आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा इगतपुरीच्या तहसीलदार वंदना खरमाळे मांडगे यांच्याकडून मतदान परिस्थितीवर सूक्ष्म लक्ष घातले जात आहे. केंद्रात मोबाईल नेण्याला बंदी असल्याने सेल्फी काढणाऱ्या मतदारांची पंचाईत झाली.
इगतपुरी तालुक्यात 156 मतदान केंद्र असून आज सकाळी 7 वाजता प्रत्यक्ष मतदानाला प्रारंभ झाला. दुपारी उन्हाची काहिली सुरू होत असल्याने लवकर मतदान करण्याचा अनेकांचा कल आहे. तालुक्यातील 4 मतदान केंद्रावर यंत्रात तांत्रीक बिघाड झाल्याने तातडीने यंत्र बदलून मतदान सुरू करण्यात आले. दिव्यांग आणि वृद्ध मतदारांना मतदान करता यावे म्हणून प्रत्येक केंद्रावर विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. टिटोली येथील मतदान केंद्र महिला अधिकारी आणि महिला पोलीस यामुळे चर्चेत आले. महिला मतदारांनी ह्या केंद्रावर उत्सुकतेने मतदान केले. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांसह जागरूक नागरिकांनी जागृती सुरू केल्याचे दिसले.