इगतपुरी, त्र्यंबक पालिकेची निवडणूक जाहीर१० डिसेंबरला मतदान : सटाण्यात पोटनिवडणूक; पानेवाडी गणातही मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 01:24 AM2017-11-08T01:24:28+5:302017-11-08T01:24:33+5:30
जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर येथील नगरपालिकांच्या निवडणुकीचा व सटाणा पालिकेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर येथील नगरपालिकांच्या निवडणुकीचा व सटाणा पालिकेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
इगतपुरी, त्र्यंबकेश्वर येथील नगरपालिकांच्या निवडणुकीचा फड रंगणार आहे. सटाणा पालिकेतील प्रभाग क्रमांक ५ अ मध्ये पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १६ ते २२ नोव्हेंबर या काळात नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे. दि. २३ नोव्हेंबर रोजी छाननीनंतर उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. २८ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज माघारी घेता येणार आहे. रविवार दि. १० डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. सोमवार ११ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने विविध राजकीय पक्षांनी तयारीला मोठ्या प्रमाणावर वेग दिला आहे. केवळ इच्छुक उमेदवारच नव्हे तर इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तसेच सटाणावासीयांना निवडणुकीची मोठ्या प्रमाणावर उत्सुकता लागली असल्याचे चित्र आहे. इच्छुकांची नावे अद्याप स्पष्ट झाली असली तरी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रीयेत इच्छुकांची नावे स्पष्ट होणार आहे. काही जण अपक्ष उमेदवारी करून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने हा फड चांगलाच रंगणार आहे.
पानेगाव गणाची पोटनिवडणूक १३ डिसेंबरला
नांदगाव पंचायत समितीच्या पानेगाव गणाची पोटनिवडणूक १३ डिसेंबर रोजी होणार आहे. येथील मतमोजणी १४ डिसेंबरला होणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले. ज्याठिकाणी निवडणुका होणार आहेत तेथे मंगळवारपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली असल्याचेही आयोगाने कळविले आहे.